Amit Shah : गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून
नवी दिल्ली : गुजरात दंगलीप्रकरणी (Gujrat Riots) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या प्रकरणातील दीर्घ लढ्यानंतर सत्य सोन्यासारखे बाहेर आले आहे. मोदीजींना खोट्या आरोपांमुळे 19 वर्षे वेदना सहन कराव्या लागल्या, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर अमित शहा यांनी एक वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.
अमित शाह म्हणाले की, या प्रकरणातील दीर्घ लढ्यानंतर सत्य सोन्यासारखे बाहेर आले आहे. मोदीजींना खोट्या आरोपांमुळे 19 वर्षे प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. 18-19 वर्षांची लढाई, देशाचा एवढा मोठा नेता, एक शब्दही न उच्चारता, भगवान शंकराच्या विष प्यायल्यासारखे सर्व दु:ख सहन करून लढत राहिला. मी मोदीजींना जवळून या वेदनांना तोंड देताना पाहिले आहे.
गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरील दंगलीतील आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून अमित शहा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तुम्ही म्हणू शकता की या निकालामुळे हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सिद्ध झाले आहे. तर, ज्यांनी मोदीजींवर आरोप केले, त्यांच्यात विवेक असेल तर त्यांनी मोदीजी आणि भाजप नेत्याची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, दंगलीप्रकरणी मोदींचीही चौकशी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर कोणीही धरणे आंदोलन केले नाही आणि आम्ही कायद्याला सहकार्य केले आणि मला अटकही झाली. परंतु कोणतेही धरणे प्रदर्शन झाले नाही, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली आहे.
२००२ च्या गुजरात दंगलींच्या तपासात एसआयटीने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली होती. परंतु, एसआयटीच्या अहवालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील निकालात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोदींना क्लीन चिटवर शिक्कामोर्तब केले.