लालसिंग चढ्ढासमोर अडचणींचा डोंगर; सनातन रक्षक सेना योगींकडे करणार बंदीची मागणी
आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला प्रदर्शीत झाल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करवा लागतोय. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी होतेय. या संदर्भात एक नवीन अपडेट आली आहे. आता सनातन रक्षक सेना या हिंदू संघटनेचे सदस्य उत्तर प्रदेशमध्ये चित्रपटाला विरोध करत आहेत. चित्रपटावर पूर्ण बंदी घालण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. संस्थेच्या सदस्यांनी अद्वैत चौहान दिग्दर्शित चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि अभिनेता अमिर खानवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. उत्तर प्रदेशातील भेलुपूर येथील आयपी विजया मॉलच्या बाहेर निदर्शनं करण्यात आली.
संघटनेचे सदस्य म्हणाले, 'आम्ही सर्व सनातनी लोक हा चित्रपट आमच्या देशात चालू देणार नाही.' सेनेच्या युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष चंद्र प्रकाश सिंह आणि उपाध्यक्ष अरुण पांडे यांनी आमीर खान सनातन धर्माच्या विरोधात असल्याचा दावा केला होता. ते म्हणाले, आम्ही प्रत्येक घरात जाऊन लोकांना आमीर खानच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची विनंती करू. यासोबतच आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही या चित्रपटावर बंदी घालण्याची विनंती करणार आहोत असं या संघटनेच्या वतीनं सांगण्यात येतंय.
आमिर खान आणि करीना कपूर खान यांचा लाल सिंग चड्ढा हा 1994 च्या हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाला ऑस्करही मिळाला होता. हा चित्रपट बनवण्यासाठी आमिरने मोठी मेहनत घेतली आहे. एका मुलाखतीत आमिरे सांगितलं होतं की, चित्रपटाचे हक्क मिळवण्यासाठी त्याला आणि त्याच्या टीमला अनेक दशकं लागली आहेत.