अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या झाडून एकाची हत्या; मृताच्या भावालाही धारदार शस्त्राने...
अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार करून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडलीये. शिवाजीनगर परिसरात आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. तुषार गुंजाळ असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इसमाचं नाव असून व्यावसायिक वादातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय. अंबरनाथ (Ambernath) पूर्वेतील शिवाजीनगर परिसरात शिवसेना शाखेसमोर आज दुपारच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली.
तुषार गुंजाळ आणि गणेश गुंजाळ या दोन सख्ख्या भावांवर हा हल्ला करण्यात आला. यापैकी तुषार याला गोळी लागल्यानं त्याचा या घटनेत मृत्यू झाला, तर गणेश याच्यावर धारदार शस्त्रानं वार झाल्यानं तो जखमी झालाय. एका स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या दोन ते तीन जणांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तर हा प्रकार जुन्या व्यावसायिक वादातून घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्लेखोरांचा सध्या पोलीस शोध घेत असून अद्याप गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्यानं पोलिसांनी कॅमेरासमोर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.