Ambadas Danve : टोल वसुली कंपन्यांबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

राज्यातल्या टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबई: राज्यातल्या टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. उड्डाणपूलांसाठी झालेला खर्च, टोल वसुलीचा कालावधी तसेच टोल वसूलीतून मिळालेली रक्कम याबाबत राज्यातील सर्व टोल नाक्याबाबत श्वेतपत्रिका काढून याबाबतची वस्तुस्थिती राज्यातील जनतेसमोर आणावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबईत सुमारे ५५ उड्डाणपुलाचा खर्च वसूल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांनी MEP Infrastructure या कंपनीस सन २०१० पासून मुंबईच्या प्रवेश द्वाराजवळ टोल वसूल करण्यास परवानगी दिलेली आहे. तथापि सदर उड्डाणपूलासाठी झालेल्या खर्चाची वसुली पूर्ण होवूनही सदर कंपनीद्वारे टोलवसुली सुरु आहे. त्याचा नाहक भुर्दंड राज्यातील सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे.

याचप्रमाणे राज्यातील अनेक टोलसंदर्भात खर्च वसुली पूर्ण होऊन देखील काही वर्षापासून टोल वसुली सुरु आहे. टोलवसुलीची खरी आकडेवारी संबंधित कंपन्यांकडून लपविली जात आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैर व्यवहार होत असल्याची बाब निदर्शनास आली असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता रस्ते, उड्डाणपूल यासाठी झालेला खर्च टोल वसुलीचा कालावधी तसेच टोल वसूलीतून मिळालेली रक्कम याबाबत राज्यातील सर्व टोल नाक्याबाबत श्वेतपत्रिका काढून याबाबतची वस्तुस्थिती राज्यातील जनतेसमोर आणावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com