Amarnath
Amarnath Team Lokshahi

अमरनाथ यात्रेकरुला वाचवण्याच्या प्रयत्नात 22 वर्षीय मुस्लिम तरुणाचा दरीत पडून मृत्यू

Amarnath : गेल्या 36 तासांत सहा यात्रेकरू, एका घोडेस्वाराचा मृत्यू
Published by :
Sudhir Kakde
Published on

दक्षिण काश्मीरच्या पहलगाम भागात अमरनाथ (Amarnath) यात्रेतील एका भक्ताला वाचवताना एका 22 वर्षीय युवकाचा दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. इम्तियाज खान असं मृताचं नाव आहे. इम्तियाज हा नेहमी यात्रेकरूंची मदत करत असत. वृत्तानुसार, अपघातापूर्वी इम्तियाज घोड्यावरून जात होता. तेव्हा त्याची नजर घोड्यावर स्वार होऊन झोपलेल्या यात्रेकरूवर पडली. इम्तियाजने पाहिले की प्रवासी झोपला आहे आणि तो कधीही पडू शकतो. यावेळी तो त्या यात्रेकरुला सावध करण्याच्या प्रयत्नात स्वत: खोल दरीत कोसळला.

इम्तियाजचे मामा नजीर अहमद खान यांनी सांगितलं की, यात्रेकरूला उठवण्याचा प्रयत्न करत असताना इम्तियाजचा तोल गेला आणि तो कड्यावरून खाली पडला. तो थेट 300 फूट खोल दरीत पडला. त्यानंतर पर्वतारोहण बचाव पथकाने (एमआरटी) मोठ्या कष्टाने त्याचा मृतदेह बाहेर काढला. नजीर सांगतात की, इम्तियाज खान हा त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. त्याच्यावर त्याची पत्नी, आठ महिन्यांचं मूल, त्याचे आई-वडील आणि चार भावंडांची जबाबदारी होती. इम्तियाजचे वडील अंशतः अंध असून ते काम करू शकत नाही. तसंच त्याच्या तीन बहिणींची लग्नं सुद्धा अजून व्हायची आहेत. आता या कुटुंबाला सरकारकडून काही नुकसान भरपाईची अपेक्षा आहे.

Amarnath
Indore Bus Accident : लग्नासाठी मुलगी पसंत करुन घरी येताना अमळनेरच्या तरुणाचा काळानं घात केला

गेल्या 36 तासांत सहा यात्रेकरू, एका घोडेस्वाराचा मृत्यू

अमरनाथ यात्रेदरम्यान गेल्या ३६ तासांत सहा यात्रेकरू आणि एका यात्रेकरुंना वर घेऊन जाणाऱ्या घोडे चालकाचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. यात्रेदरम्यान आतापर्यंत एकूण 49 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 8 जुलै रोजी आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या 15 यात्रेकरुंचाही समावेश आहे. 30 जूनपासून सुरू झालेल्या यात्रेत आतापर्यंत 47 प्रवासी आणि दोन घोडेस्वारांचा मृत्यू झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com