Nana Patole: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; नाना पटोले सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...
पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला. गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बदलापूर अत्याचाराच्या आरोपीचा मृत्यू झाला आहे. अक्षयनं बंदुक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला होता. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ही घटना घडली आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
नाना पटोले ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हणाले की, बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे.
शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वत:वर आणि पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
१. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही ?
२. फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का ?
३. हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का?
या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी.