अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; उदय सामंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; उदय सामंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता याच प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

तळोजा जेलमध्ये पोलीस आरोपीचा ताबा घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्याला बदलापूरला घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केले. यामधील एक गोळी API निलेश मोरे या पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला लागली तर इतर दोन राऊंड मिसफायर झाले. त्यानंतर सेल्फ डिफेन्ससाठी पोलीस अधिकाऱ्यांनी गोळ्या झाडल्या. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला. गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ही घटना घडली.

याच पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले की, अक्षय शिंदेनं पोलिसांवर पिस्तुल घेऊन फायरिंग करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये संरक्षणार्थ जो गोळीबार झाला त्याच्यामध्ये अक्षय शिंदे मृत पावला अशी माझी प्राथमिक माहिती आहे. याची सविस्तर चौकशी होईल आणि चौकशीअंती जे काही आहे ते निष्पन्न होईल. परंतु अक्षय शिंदे जो मारला गेलेला आहे तो काय सज्जन माणूस नव्हता. 15 - 20 दिवसांपूर्वी त्याच नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला होता. त्यावेळी हेच सगळे आज मुलाखत देणारे सांगत होते त्याला फासावर लटकवलं पाहिजे.

यासोबतच उदय सामंत पुढे म्हणाले की, त्या प्रसंगाचे राजकीय भांडवल करण्याचे काम देखील महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी केलं. काल जेव्हा अक्षय शिंदेंनं पिस्तुल घेऊन फायरिंग केलं तेव्हा त्यांचं स्वत:चं संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी जो गोळीबार केलेला होता त्याच्यामध्ये अक्षय शिंदे हा मृत पावलेला आहे. परंतु आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर नाही तर देशाच्या जनतेसमोर महाविकास आघाडीच्या लोकांचा दुटप्पीपणा समोर आलेला आहे. चिमुरड्या मुलीच्या अत्याचाराचे भांडवल करुन राजकारण मतासाठी करायचं त्याच्यातून एखादी गोष्ट घडल्यानंतर ही बाजूला ठेवायची आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा राजकारण करुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करायचं हे दुर्दैवी आहे. अक्षय शिंदे हा सज्जन माणूस नव्हता. या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी होईल. चौकशीअंती योग्य तो निर्णय होईल. असे उदय सामंत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com