महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश; व्हिडिओ ट्विट करत अजित पवार म्हणाले...

महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश; व्हिडिओ ट्विट करत अजित पवार म्हणाले...

महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश असे अजित पवार यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे.

महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश असे अजित पवार यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये अजित पवार म्हणाले की, माझ्या महाराष्ट्रवासियांनो, मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल. राज्याचा अशा प्रकारचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचे भाग्य मला लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे. या अर्थसंकल्पात 'माझी लाडकी बहिण' या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील प्रत्येत पात्र महिलेच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेवर राज्य सरकार प्रतिवर्षी 46000 हजार रुपये खर्च करणार आहे. आजवर आपण पाहत आलोय की, प्रत्येक कुटुंबातील 'आई' स्वत:वरील खर्चात शक्य तितकी काटकसर करते. पण आपल्या मुलाबाळांना काही कमी पडणार नाही. याची काळजी घेते. परुंतु काही वेळा परिस्थितीच अशी निर्माण होते की, आर्थिक अडचणींमुळे घरातील मुलांकडे जास्त लक्ष दिलं जातं आणि नेमकं मुलींकडे दुर्लक्ष होते.

मात्र आता मला आशा आहे की, माझी लाडकी बहिण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसहाय्यामुळे राज्यातील माता- भगिनींची ही विवंचना दूर होईल. त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सशक्त आणि स्वावलंबी होऊ शकतील. माझी मनस्वी इच्छा आहे की, राज्यातील प्रत्येक महिला आर्थिक, सामाजिकदृष्या सक्षम व्हावी. स्वत:च्या पायावर उभी राहावी. कुठल्याही महिलेला असं वाटू नये की, आपल्या दैनंदिन गरजांसाठी वडील, भाऊ किंवा नवऱ्यावर अवलंबून आहोत. त्यामुळेच ज्यावेळी माझी लाडकी बहिण योजनेचा विचार करतो. तेव्हा मला ही योजना म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकण्यात आलेलं. अत्यंत क्रांतिकारी पाऊल वाटतं. आमच्या सरकारने आपल्या अनुभवाच्या जोरावर हे अशक्य वाटणारे काम शक्य करुन दाखवलं आहे. एवढंच नाही तर राज्यातील माता भगिनींनी पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागे राहणार नाहीत. हे सुनिश्चित करण्यासाठी इतर अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत. अर्थसंकल्पात राज्यात 25 हजार नवीन उद्योगांच्या उभारणीसाठी देखील आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी 30% युनिटमध्ये महिला उद्योजकांना साहाय्य केलं जाणार आहे. महिलांना पिंक ई- रिक्षा चालविण्यास सक्षम बनवलं जाणार आहे. शिवाय शाळा, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना देखील मोफत शिक्षण दिले जाणार आहे.

आणखी एक महत्वाची योजना म्हणजे युवा कार्यप्रशिक्षण योजना आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील तरुण- तरुणींना औद्योगिक प्रशिक्षण आणि सोबतच 10 हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड दिला जाईल. महिला, तरुण, तरुणींच्या सक्षमीकरणाच्या बरोबरीनं राज्याच्या, आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा जपण्याचा आणि पुढे नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपल्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. पंढरपूरला वारीला जागतिक नामांकन मिळावं. यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणे वारीतल्या मुख्य पालख्यांतील दींड्यांना प्रतिदींडी 20 हजार रुपये देणं असे अनेक महत्वाचे निर्णय आम्ही घेतलेलं आहेत. राज्यातल्या वारकरी बांधवांच्या पाठिशी भक्कमपणे उभं राहणं आणि वारकरी सांप्रदायाची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे नेणं यासाठी मी आणि राज्य शासन बांधिल आहे. तुम्ही पाहिलं असेलच की, नकारात्मक निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत. त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचे सांगितलं जात आहे. काहींकडून तर या बजेटला लबाडाच्या घरचं आवतान आणि अजून बरीच नावं ठेऊन हिणवलं जात आहे. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की, या लोकांमध्ये आणि तुमच्या अजितदादामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे आहेत आणि तुमचा दादा काम करणारा आहे. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. ती म्हणजे राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही, पार्टी बदललेली नाही. अगदी पहिल्यादिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे.

यासोबतच अजित पवार पुढे म्हणाले की, मी पूर्वीही जनतेचाच होतो आणि आजही जनतेचाच आहे. मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचा विचार करतो. राज्याच्या, राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल याचाच विचार माझ्या डोक्यात कायम सुरु असतो. राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट समोर ठेऊन त्याच विचारातून हा अर्थसंकल्प बनवण्यात आला आहे. त्यामुळे जे लोक बजेटच्या नावाने नाक मुरडत आहेत. त्यांचे चेहरे आजच नीट बघून घ्या आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा. ही तीच लोक आहेत. ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरादारात येऊ द्यायची नाही आहे. ही तीच लोक आहेत. ज्यांना सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे. मी अर्थसंकल्पात राज्यातील गोरगरिब कुटुंबांना वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली. त्याबदल्यात मला शिव्या शाप मिळत आहेत. माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांची दु:ख आणि वेदना समजून घेतल्या आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांच्या दु:खावर फुंकर घालायचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पात आम्ही 44 लाख शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केलं हे सहन होत नाही. म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलेलं दिसतंय. आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्यावर्षी 350रुपये क्विंटल अनुदान दिलं. तर त्याला विरोध का? यावरुनच कोण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करतंय आणि कोण शेतकरी विरोधी आहे. हे आपल्या लक्षात आलं असेलच. काहीजण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पुरेशा रकमेची तरतूद नसल्याची तक्रार करत आहेत. मी जेव्हा अर्थसंकल्प सादर करत होतो. त्यावेळी बहुतेक ही लोक झोपलेली असावीत. आम्ही दूध उत्पादकांसाठी प्रतिलीटर पाच रुपये अनुदान जाहीर केलं आणि या लोकांना त्याची खबरबातच नाही. आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला. धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार बोनस त्याठिकाणी दिला जात आहे. इतकं सगळे करुन देखील ही लोक आम्ही काहीच केलं नसल्याच्या बोंबा मारत आहेत. त्यात तथ्य नाही. अर्थसंकल्पात ग्रामीण भागावर विशेष लक्ष देणारा आहे. पण माझ्या विरोधकांना त्यांचं काय राज्याच्या विकासाशी यांचं काही देणं - घेणं नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. गावगाड्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी, दुरुस्तीसाठी आम्ही 7 हजार 600 कोटींचा निधी दिला. पण यांच्या पोटात दुखायला लागलं. गावखेड्यातला माणूस लवकर शहरात पोहचून तिथलं काम आटोपून रात्रीच्या जेवणासाठी घरी परत यावा. याची व्यवस्था आम्ही करतो आणि विरोधकांच्या पोटात कळा यायला लागल्या आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुसाठी आमचा एकच मुद्दा आहे. तो म्हणजे विकास विरोधकांकडून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने फूस लावण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तुम्ही मात्र अशा प्रकारच्या घाणेरड्या राजकारणामध्ये अडकू नका. तुम्ही फक्त याकडे लक्ष असुद्या की, तुमच्या दारात विकासाची गंगा कोण घेऊन आलंय. विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलतंय? आणि तुमची काम कोण करतंय. कुणाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. काम करण्याचा, काम करुन घेण्याचा आणि काम करुन दाखवण्याचा हे लक्षात घ्या. केवळ भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांपासून जरा जपून आणि दूर रहा. जे नेते काम करत आहेत. त्यांच्या पाठिशी उभे राहा. त्यांनाच मतदान करा. तुम्हाला आठवत असेल की, 2014साली मी शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना सुरु केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल कमी झाले. सोलापूर पाटबंधारे प्रकल्प, पुणे पिंपरी- चिंचवड मेट्रो, खराडी आयटी पार्क, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क, कोल्हापूर औद्योगिक क्षेत्र असे प्रकल्प आणि पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती अशाप्रकारच्या अनेक कितीतरी शहरांचा कायापालट कोणी केला. हे तुम्हाला माहितच आहे. अशी एक ना अनेक नावं घेता येतील. कामांची यादी खूप मोठी आहे. ज्यांना आठवत नसेल त्यांनी माहिती घ्यावी की या सर्व विकासकार्यांची सुरुवात कोणी केली. या सगळ्यांमध्ये तुम्हाला तुमच्या 'दादाचा वाद' बघायला मिळेल याची मला खात्री आहे. राजकारणात आलं म्हणजे विरोध तर होणारच. जो जास्त काम करतो त्याला तर थोडा जास्तीचा विरोध होतो. म्हणूनच सहन पण करावा लागतो. म्हणूनच माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले होते. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही ना भविष्यात होईल. पण विकासाचं मॉडेल म्हणजेच सर्वसामान्यांच्या प्रमाणेच सरकारी योजनांचा लाभ आणि जनतेला दिलेलं बळ सगळ्यांना दिसतं आहे. यापुढच्या काळात देखील हे असंच दिसत राहिल. या विकासाच्या मॉडेलची पायाभरणी आम्ही करतोय. त्यावर विकसित महाराष्ट्राच्या उभारणीचं स्वप्न साकार होईल. या कार्यासाठी मला राज्यातील 13 कोटी जनतेची साथ हवी आहे. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की, प्रगत आणि विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आमच्या सोबत या आणि आमचे हात बळकट करा. असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com