अजित पवार मुख्यमंत्री होणार? दीपक केसरकर काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिवसेना-भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. सरकारमध्ये गेल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार आणि मंत्र्यांनी अनेक वेळा अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वत: अजित पवार यांनीही ती अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आज जाहीरपणे दादांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा मांडली. त्यावर शिवसेनेचे नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांक्षा असण्यामध्ये काही चुकीच नाही. परंतु, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचाच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार आहे. अजित दादांचे वय लहान आहे. त्यांना पुढच्या काळात ही संधी मिळू शकते.
काय म्हणाल्या होत्या आशताई पवार?
अजित पवार आजारी असून त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यामुळे ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, १९५७ सालापासून मी मतदान करतेय. पूर्वी सुरुवातीला काटेवाडीत काहीच नव्हतं. पण माझ्या सुनेमुळे काटेवाडीत भरपूर बदल झाले, असेही त्यांनी म्हंटले आहे.
अजित पवारांवर लोकांचं प्रेम आहे. पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की दादांनीच मुख्यमंत्री व्हावं. माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा आशाताई पवार यांनी व्यक्त केली आहे.