पंचनामाच नाही तर मदत कशी करणार? अजित पवारांचा गडचिरोलीतून सरकारला सवाल
गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरग्रस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. परंतु दहा दिवस उलटूनही प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामाच झालेला नसल्याने त्यांना मदत कशी करणार असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थिती करत सरकारला धारेवर धरले. पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याकरिता गडचिरोली जिल्ह्यात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस ते बोलत होते. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते पूरग्रस्त भागांना भेट देऊन आढावा घेत आहेत. आज त्यांनी गडचिरोली (Gadchiroli) भागाचा दौरा केला. यावेळी ते म्हणाले, मेडीगड्डा सारख्या वादग्रस्त धरणावर तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकारने तातडीने बैठक घेऊन धरणामुळे महाराष्ट्रात होत असलेल्या अन्यायावर मार्ग काढावा. या धरणामुळे सिरोंचा तालुक्याला अभूतपूर्व पुराचा फटका बसतो आहे. 25 हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली. अनेक घरांची पडझड झालेली आहे. लोकांना गावं सोडून इतरत्र स्थलांतरित व्हावं लागलं. त्याभागातील रस्ते पूर्णपणे खराब झाले. तरीही सरकारकडून कुठलीच ठोस पावले उचलण्यात आलेली नाही. असा आरोप त्यांनी केला. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार इतकी मदत देण्यात यावी. अशीही मागणी अजित पवारांनी केली. सिरोंचा आलापल्ली मार्गाचे बांधकामही तत्काळ करावं याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
अतिवृष्टीने राज्यातील 10 लाख हेक्चर शेतीचे नुकसान झाले असून एकट्या गडचिरोली जिल्ह्यात 25 हजार हेक्टर शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. येथील नागरिकांचा संसार खरीपाच्या धानावर अवलंबून आहे, मात्र पीक गेल्याने मोलमजुरी करणाऱ्यांनी जगायचे कसे असा सवालही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला. त्यामुळे एसडीआरएफचे नॉर्मस बाजुला ठेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पुलावर मोठ्याप्रमाणात पाणी वाहिले. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे 12 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. घरातील कर्ता पुरूष गेल्याने संसार कोलमडून पडला. त्यामुळे अशा आधार गमवलेल्या कुटुंबांना सरकारने भरीव मदत करावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
मुसळदार पावसामुळे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे एसडीआरएफचे नॉर्मस बाजुला ठेऊन प्रशासनाने नागरिकांना मदत करायला हवी. 12 नागरिकांचा या पावसाने बळी घेतला आहे. त्यासह शेतकऱ्यांच्या अनेक जनावरांनी आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला हवी असेही अजित पवार म्हणाले. अनेक नागरिकांची घरे कोलमडून पडली आहेत. त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे त्यांना सरकारने मदत करायला हवी. इतकेच नाही तर ज्या घरांच्या भींतीला ओलावा आला त्याचाही पंचनामा करण्याची मागणी अजित पवार यांनी आज गडचिरोलीत केली.
दोन लोकांचं सरकार कसे काम करणार?
महिना होत आला नवे सरकार स्थापन होऊन पण अद्याप त्यांचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. राज्य संकटात आहे. पण मदतीला केवळ दोन लोकांचं सरकार आहे. हे सरकार राज्य चालविण्यास सक्षम नाही. अश्या परिस्थिती बैठका घेऊन मोठे निर्णय घ्यावे लागतात. पण तसे होताना दिसत नसल्याचीही टीका अजित पवारांना यावेळी केली. दरम्यान विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी जवळच्या शिवणी गावातील नुकसानग्रस्त शेतीला भेट दिली. यावेळेस त्यांनी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. ' पूर येऊन दोन आठवडे लोटले तरीही आम्हाला विचारायचा कोणीच आले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी यावेळी अजित पवारांसमोर बोलून दाखविली.
"कोण केव्हा येतंय यावर लक्ष देण्यापेक्षा आपलं काम करा..."
अमरावतीचे खासदार अनिल बोंडे यांनी अजित पवार उशिरा येत आहेत, अशी टीका केली होती. या प्रश्नावर अजित पवार चांगलेच भडकले, म्हणाले कोण केव्हा येतंय यावर लक्ष देण्यापेक्षा भाजपच्या नेत्यांनी आपलं काम करावं. राज्य संकटात आहे राज्य आणि केंद्रात तुमचं सरकार आहे, अशावेळेस यामध्यामातून पीडित नागरिकांना काय मदत करता येईल हे बघा, अशी खरडपट्टी काढली.