'मला काही कुणाशी देणे घेणे नाही' तानाजी सावंतांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया
शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही, कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसत असलो, तरी बाहेर आलं की उलट्या होतात अस विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. सावंत यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. यावरच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली आहे. के नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.
अजित पवार म्हणाले कि, मला बाकीचे काही बोलायचे नाही. मला माझ्या पुरते बोला. याने असे केले. त्याने तसे केले. मला काही कुणाशी देणे घेणे नाही.
पुढे ते म्हणाले, मला कोणावर टीका करायची नाही. मला कोणी काही बोलले तर माझ्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. मी काम करतो. मी कामाचा माणूस आहे. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चांगल्या योजना महाराष्ट्रातील जनतेला देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ते सांगण्याचे काम आमचे चालू आहे असं ते म्हणाले.
तानाजी सावंत काय म्हणाले होते?
मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही. शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही यांच्याशी जमलं नाही. हे वास्तव आहे. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही, असंही तानाजी सावंत म्हणाले होते.