Ajit Pawar | "आम्हाला प्रतिप्रश्न करण्यापेक्षा ठोस कार्यवाही करा"; फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर
राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपूरमधील अतिवृष्टी भागाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात अजूनही पंचनामे झाले नाहीत. त्याठिकाणी तत्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणं गरजे आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. त्याचदरम्यान सरकारवर निशाणा साधताना आम्हाला प्रतिप्रश्न करण्यापेक्षा ठोस कार्यवाही करा, अशा शब्दांत त्यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना उत्तर दिले आहे. आज त्यांनी नागपूरमध्ये (Nagpur) प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
नुकसानग्रस्त भागातील पंचनामे कसे ताबडतोब सुरु होतील? त्यांना मदत कशी होईल? दुबार पेरणीसाठी बियाणं कसं मिळेल? हे यावर उत्तर पाहिजे. पण यावर कोणी बोलत नाही. मी राजकारण करण्यासाठी हा दौरा करत नाहीए. राज्यावर संकट ओढवलेलं असताना विरोधकांची जी भूमिका असते ती पण महत्वाची असते. या दौऱ्यानिमित्त दुसऱ्यांनी निवेदन देऊन त्यावर आपण बोलणं आणि आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यातील बारकावे समजतात. नंतर ते चांगल्या पद्धतीनं सभागृहात मांडता येतात. फील्डवर जाताना अनेक प्रकारचा त्रासही सहन करावा लागतो असे अजित पवार म्हणाले.
आपण तहान लागल्यानंतर विहीर खोदत नाही
या दौऱ्यानिमित्त स्थानिक कार्यकर्ते भेटत आहेत. निवडणुका असल्यावरच कार्यकर्त्यांनी भेटावं असे काही नाही. जेव्हा केव्हा निवडणुका लागतील त्याआधी प्रत्येक पक्षाची तयारी असलीच पाहिजे असे देखील अजित पवार म्हणाले. आपण तहान लागल्यानंतर विहीर खोदत नाही. आधीच विहीर खोदून ठेवतो असेही ते म्हणाले. वेगवेगळ्या समस्या घेऊन लोक भेटत आहेत. तसेच काही लोकांवर नवीन जबाबदारी सोपवली आहे. ते लोक देखील भेटी घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.