अजित पवारांना डावललं; जयंत पाटील, रोहित पवारांनी व्यक्त केला संताप
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nanrendra Modi) यांच्या देहूतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलू न दिल्याने राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडून नाराजी व्यक्त केली जातेय. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील () यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
"छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजितदादांना बोलू दिले नाही. वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असते. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अहंकाराबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात अहंकार हा आत्मनाश घडवितो, माणसाला सत्यापर्यंत पोचू देत नाही. अहंकारी मनुष्य 'आपण मोठे आहोत' अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो आणि असंच काहीसं आज प्रदेश भाजप नेत्यांचं झालं असावं. असो संत तुकोबारायांच्या दर्शनाने नक्कीच सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होईल, अशी अपेक्षा!" अशा शब्दांत रोहित पवारांनी या विषयावर भाष्य केलं आहे.
तर, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही या विषयावर बोलताना हे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. "पंतप्रधानांच्या मागील पुणे दौऱ्यातील पुणे महानगर पालिकेच्या कार्यक्रमात काही व्यक्तींना खडे बोल सुनावल्याने भाजपाने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची धास्ती घेतलेली दिसत आहे. म्हणूनच मा. अजितदादा पवार यांना षडयंत्र करून आज देहू येथील कार्यक्रमात बोलून दिलेले नाही." असं जयंत पाटील म्हणाले आहेत.