मुस्लीम व्यक्तीच्या हातानं हनुमानाची आरती; तर अजित पवार इफ्तार पार्टीत
पुणे : राज्यात सध्या हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) विरुद्ध भोंगा असा वाद राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयामुळे निर्माण झाला आहे. त्यानंतर आज हनुमान जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी या वादाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मनसेकडून (MNS) अनेक शहरात हनुमान चालिसा पठण करण्यात आलं तर राष्ट्रवादीकडून मात्र आरती आणि इफ्तार पार्टी (Iftar Party) अशा सर्वधर्म समभाव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे स्वत: उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या मुस्लीम कार्यकर्त्याने स्वत: आरती केल्याचं पाहायला मिळालं. तसंच या कार्यक्रमानंतर लगेचच ते इफ्तार पार्टीसाठी गेले.
दरम्यान, राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून सर्वधर्म समभाव हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे राज ठाकरे हे मनसेने आयोजित केलेल्या महाआरतीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. एकुणच आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने सर्वच पक्ष आज देवाच्या दारी गेल्याचं पाहायला मिळतंय.