Ajit Pawar latest News
Ajit PawarLokshahi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पैसा कुठून आणणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ट्वीटरवर दिली सविस्तर माहिती, म्हणाले...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून विरोधकांनी महायुती सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. या योजनेसाठी राज्य सरकारने पैशांची तरतूद कशाप्रकारे केली आहे? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Ajit Pawar Tweet : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून विरोधकांनी महायुती सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. या योजनेसाठी राज्य सरकारने पैशांची तरतूद कशाप्रकारे केली आहे? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये शंकेची पाल चुकचुकली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरु केली आहे. यामागे सत्ताधाऱ्यांचा राजकीय स्वार्थ आहे, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी या योजनेबाबत ट्वीटरवर सविस्तर माहिती दिली आहे.

अजित पवार ट्वीटरवर काय म्हणाले?

महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली. चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार? हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे.

राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही.

काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com