"द्यायचं असेल तर कॅबिनेट मंत्रिपद द्या, त्यासाठी आम्ही..."; पत्रकार परिषदेत अजित पवार थेट म्हणाले
Ajit Pawar Press Conference : आता लोकसभेचा एक सदस्य आहे आणि राज्यसभेचा एक सदस्य आहे. पण दोन-तीन महिन्यात राज्यसभेचे आमचे तीन सदस्य होणार आहेत. लोकसभेचे सुनील तटकरे आहेत. त्यामुळे पार्लमेंटमध्ये राष्ट्रवादीची राज्यसभा आणि लोकसभेचा समावेश केल्यावर एकणू सदस्य संख्या ४ होणार आहे. द्यायचं असेल तर कॅबिनेट मंत्रिपद द्या, त्यासाठी आमची थांबण्याची तयारी आहे. सुनील तटकरेंना मंत्रीपद द्यायचं की प्रफुल्ल पटेलांना, याबाबत आमच्यात कोणताही वाद नाही. प्रफुल्ल पटेल यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी प्रफुल्ल पटेल यांचं नाव निश्चित केलं आहे. भाजपने आम्हाला राज्यमंत्री देण्याचं सांगितलं होतं. परंतु, पटेलांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केल्यानं त्यांना पुन्हा राज्यमंत्रीपद देणं चुकीचं वाटतं, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारच्या वतीनं एक जागा ठरवण्यात आली होती. राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अशाप्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती. परंतु, त्यांचा आग्रहा असा होता की, आमच्याकडून प्रफुल्ल पटेल यांचं नाव निश्चित आहे. ते आधी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) करता येणार नाही. जेव्हा युतीचं सरकार असतं, त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात. कारण अनेक पक्ष सोबत असतात. त्यामुळे एका पक्षासाठी तो निकष लागू होत नाही. पण मला विश्वास आहे, भविष्यात जेव्हा विस्तार होईल, त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार होईल.
केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही मंत्रिपद मिळणार नाही. केंद्रीय मंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वाद सुरु असल्याची चर्चा होती. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याचंही बोललं जात होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार नसल्याचं माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.