तातडीनं अधिवेशन बोलवा अन् ओला दुष्काळ जाहीर करा; अजित पवार आक्रमक
राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिल्ली दौरे करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राज्यातील परिस्थितीकडेही लक्ष द्यावं असं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री आता वेगवेगळ्या भागांत दौरा करणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र राज्यातल्या सगळ्या परिस्थितीची गंभीरता मांडण्यासाठी सर्वात योग्य माध्यम हे विधानभवन असतं. मात्र हे सरकार एकीकडे बहुमतात आहे असं सांगतात, मात्र अधिवेशन घेत नाहीत. यांना कुणी अडवलंय अधिवेशन घ्यायला असं म्हणत अजित पवार यांनी अतिरिक्त पावसामुळे होणाऱ्य़ा परिणामांबद्दल माहिती दिली. तसंच आम्ही मागच्या काळात नद्यांमधला गाळ काढल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा फुगवटा वाढला नाही आणि परिणामी चिपळून सारखी शहरं सुरक्षित राहिली.
अजित पवार यांनी एकूणच राज्यातील परिस्थिती पाहता, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली आहे. एस. डी. आर. एफच्या अटी शर्थी बाजुला ठेवून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी पवारांनी केली. दिल्लीत वेगवेगळ्या कामानिमित्त दौरे होत असतील, मात्र आपल्या भागातील लोकांची मदत करायची नाही का? असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी तातडीनं अधिवेशन बोलवण्याचं आवाहन केलंय. तसंच तिरुपती बालाजीला गेलेल्या वाहनांवर शिवाजी महाराजांचा फोटो काढण्यावरुन निर्माण झालेल्या वादावर देखील मी मिलिंद नार्वेकर यांना अधिकृत माहिती द्यावी असं मी सांगितलं असल्याचं पवार म्हणाले. तसंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील तिथल्या मुख्यमंत्र्यांना बोलून या प्रकरणाची चौकशी करुन लोकांना माहिती द्यावी असं पवार म्हणाले.