Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत” पवारांची बारामतीकरांना भावनिक साद
बारामतीमध्ये अजित पवारांची देखील सांगता सभा पार पडली. या सभेला बारामतीकरांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. बारामतीची ही राजकीय लढाई यंदा पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची ठरलीये. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष बारामतीकडे लागून राहिलंय. असं असतानाच अजित पवारांची सांगता सभेलाही मोठ्या संख्येने बारामतीकर हजर होते.
अजित पवार काय म्हणाले?
मला सहा वाजता थांबायचं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल, दादा तुम्ही बोललाच नाही. आज सांगता सभा घेतो आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील फार महत्वाचा दिवस आहे. महायुती उमेदवार म्हणून आशीर्वाद घ्यायला आलो आहे. मी विधानसभा निवडणुकीत आठव्यांदा तुमच्या समोर उभा आहे.
आज तुमच्या गर्दीचा अंदाज चुकला आहे. तुमची गैरसोय झाली. आपलं नातं कळलं नाही. सगळ्यांचे डिपॉझिट फक्त बारामतीकरच जप्त करू शकतात. मला विक्रमी मतांनी निवडून दिलं. त्यामुळे मी भरघोस निधी आणला. तीन वर्षात ९ हजार कोटी रुपये बारामतीचा विकासासाठी आणले.
माझ्या मनात संमिश्र प्रकारच्या भावना आहेत. मागील 35 वर्षांपासून बारामतीकर मत देत आहात. मी ९९ साली झालेल्या सभेत टेन्शनमध्ये होतो. तेव्हा सर्वपक्षीय होतो. मला त्यावेळीही चांगल्या मताने विधानसभेत पाठवलं. आपण काम करताना जबाबदारी आहे, असं काम करत होतो.
गेले दोन ते तीन महीने मी संपूर्ण राज्यभर फिरत आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी यांनी जनतेसाठी अनेक योजना आणल्या आहेत. लाडकी बहीण योजना, मुलीना शिक्षण मोफत केले. यासाठी राज्याच्या बजेटमध्ये तरतूद केली. विरोधकांनी यावर खूप टीका केली. १९९१ पासून आतापर्यंत विकासाच्या बाबतीत मागे वळून पाहिले नाही.”
पाच वर्षांमध्ये करोंना आणि विरोधी पक्षात असताना देखील बारामतीचा बस डेपो केला. शिवसृष्टीचे काम सुरू आहे. पालखी महामार्ग चांगला केला. मेडिकल कॉलेज चांगले केले. अजून अनेक कामे राहिली आहेत. त्यासाठी फक्त तुम्हाला २० तारखेला पहिल्या नंबरचे घडल्याचे बटण दाबावे लागणार आहे. ते तुम्ही दाबले की मी तुमचे काम केलेच.”