Ajit Pawar : आधी साहेबांना आणि मुलीला निवडून दिलं आता सुनेला मतदान द्या; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. गुडीपाडव्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत सभा पार पडली आहे. यावेळी बोलताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. तसेच आतापर्यंत तुम्ही साहेबांना आणि मुलीला मतदान केलं आता सुनेला मतदान करण्याची वेळ आलीये असं आवाहन त्यांनी बारामतीकरांना केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
ही निवडणूक आपल्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. या निवडणुकीत बारामतीकरांच्या मनात वेगळी भावना आहे. आता कुणाला मतदान करायचे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मी 1991 साली खासदारकीला मला निवडून दिल पुन्हा पवार साहेबांना निवडून दिल त्यानंतर सुप्रियाला निवडून दिल त्यामुळे आता सुनेला संधी द्यायची वेळ आलीये.
पुढे ते म्हणाले की, मोदींच काम बघून त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. पुलवामा हल्ल्यात पाकिस्थानला मोदींनी धडा शिकवला. गेल्या दहा वर्षात मोदींनी एकदाही सुट्टी घेतली नाही. दरवर्षी आपण दिवाळी आपल्या घरी साजरी करतो. मात्र मोदीजी दिवाळी साजरी न करता आपल्या सैनिकांना बॉर्डरवर भेटी देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम करतात. समृद्धी महामार्ग तयार केला. याला हजारो कोटी रुपये दिले.
राजकारणात विरोधाला विरोध करून चालत नाही. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू आणि कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. मोदीजी हे व्हिजन असलेले नेते आहेत. गेल्या दहा वर्षात केंद्रातील आपलं एकही काम झालेलं नाही. अमित शहा यांनी राज्यातील साखर कारखान्यांचा दहा हजार कोटींचा टॅक्स माफ केला. महाराष्ट्रातील अनेक कारखाने अडचणीत आलेले आहेत.
बारामतीमध्ये विकास होत चाललेला आहे. त्यामुळे आपल्या लोकांना पैसे मिळत आहेत. एक काळ असा होता. छत्रपती सहकारी साखर कारखाना माळेगाव सहकारी साखर कारखाना यांचे बिल झाल्याशिवाय बारामतीकरांची दिवाळी साजरी होत नव्हती. अजित पवार जर सरकारमध्ये नसता तर बारामतीकरांना पाणी सुद्धा मिळालं नसतं. बारामतीमधील 90 टक्के कामे हे मी केलेली आहेत. मात्र काही जण आपल्या पुस्तकांमध्ये आपण काम केल्याचं सांगत आहेत असा टोला त्यांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंना लगावला आहे.
राज्य सरकारने एमआयडीसी बाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. ज्यांनी एमआयडीसी भूखंड घेतला व त्यावर काही केलं नाही त्या भूखंड एमआयडीसी जमा करून घेऊन दुसऱ्यांना देणार आहे. राज्यातील तब्बल साडेआठ लाख शेतकऱ्यांना सोलर पॅनल देण्याचा निर्णय घेतलेला आहे. गुंजवणीचा रखडलेला प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत..लवकरच नाझरे धरणार पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
बारामती मधील लोकांनी माझ्या विचाराचा उमेदवार निवडून दिल्यानंतर मला मोदी साहेबांना हक्काने कामे सांगता येतील. या अगोदरचे परंपरा अशी होती की फॉर्म भरल्यानंतर डायरेक्ट शेवटची सभा व्हायची. मात्र त्यांना आता बारामती मध्ये का फिरावं लागतं.
मी विद्या प्रतिष्ठान मध्ये ट्रस्टी झाल्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या शाखा वाढवल्या. या अगोदर कुठे शाखा वाढल्या का ? विद्या प्रतिष्ठानच्या शाखा वाढवताना मला नको सांगण्यात आलं होतं.. मात्र मी माझी जिद्द सोडली नाही. आज विद्या प्रतिष्ठानमध्ये तब्बल पंचवीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बारामती हे आता एज्युकेशन हब बनत चाललेला आहे.
मी कोणालाही स्वप्न दाखवत नाही. केंद्रात मोदी सरकार चांगलं काम करत आहे यांचीच त्यांच्याच या विकासाची जोड बारामतीला मिळाली तर बारामतीचे अनेक प्रश्न दूर होतील. आता अनेकांना कधी नव्हे तर फोन यायला लागलेत आणि ज्यांना फोन यायला लागले त्यांची नावं देखील त्यांना माहीत नसतील असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.