बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन अजित पवार संतप्त, "आरोपींचे *** काढून टाकलं पाहिजे"
बदलापूरमधील घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक आत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतरही शाळा प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कोणतीही कारवाई न केल्याने एकच संताप उसळला होता. या घटनेचे सर्वच ठिकाणी तीव्र पडसाद पहायला मिळत आहेत. यावरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'अशा विकृतांचे सामानच काढून टाकलं पाहिजे' असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. ते यवतमाळ येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले की, "काही नराधम आणि विकृत माणसं काही गोष्टी करतात. त्याला लाडकी बहीण योजनेशी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात. माझी विरोधकांना पण विनंती आहे. वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या. मी कोणत्याही घटनेचं समर्थन करणारा नाही. जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे. तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या. त्याची फिकीर आम्ही करणार नाही. त्याला आम्ही कडक शासन करणार आहोत. आमचा शक्ती कायद्यासाठी प्रयत्न सुरु आहे, राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी गेलाय. अशा प्रकारची विकृत माणसं जेव्हा आमच्या आया-बहिणींवर हात टाकतात, त्यावेळी त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर अशा विकृतांचे सामानच काढून टाकलं पाहिजे" असा संताप त्यांनी व्यक्त केला.
शहरी भाग, ग्रामीण भाग, विदर्भ, मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र , कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र कोठेच कायदा व सुव्यवस्था अडचणीत येता कामा नये. यासाठी कडक कारवाई केले जातात, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.
विरोधक टीका करत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विरोधक कोर्टात जात आहे. माझी विनंती आहे कुणालाही लाभ पासून वंचित ठेवणार नाही. ओवाळनी म्हणून 3000 दिले. आणखी पैसे येतील. 45 हजार कोटी महिलांना मिळणार आहे. आमच्या चांगल्या योजनेला विरोधकानी पाहावं किती प्रतिसाद आहे, असा टोला त्यांनी लगावला.