PM Modi Sabha LIVE: पंतप्रधान मोदी यांच्या सभेला अजित पवारांची पाठ
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नेते व उमेदवार राज्यभर प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुंबईतील दादर येथे छत्रपती शिवाजी महाराज पार्कात महायुतीची जाहीरसभा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कात महायुतीच्या प्रचारार्थ आज भाषण करतील. मात्र, आज महायुतीच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि उमेदवारांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सारं काही आलबेल आहे का हा सवाल विचारला जात आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी ही पंतप्रधान मोदी यांची आजची शिवाजी पार्कातली शेवटची सभा आहे. मुंबईकर बंधू-भगिनींनो माझा तुम्हाला नमस्कार! म्हणत पंतप्रधान मोदी यांनी मराठीमधून आपल्या भाषणाची सुरुवात केली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीसोबत असल्याचं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. "महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे" चा नारा मोदी यांनी पुन्हा दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महाराष्ट्रातील महान व्यक्तींना स्मरण करून वंदन केलं.
देश पुढे जातो त्याचा मविआला त्रास होतो. महाविकास आघाडी जी दररोज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करते. काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी प्रस्ताव आणते. भारताची जेव्हा प्रगती होते तेव्हा महाविकास आघाडीच्या पोटात दुखते. महाविकास आघाडीपासून सावध राहा. मविआला देशापेक्षा आघाडी महत्त्वाची वाटते. इतकी वर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्न प्रलंबित होता. तो आम्ही मिळवून दिला असल्याचं वक्तव्य मोदी यांनी केलं आहे. आमच्या सरकारने स्टार्टअप योजना आणल्या. गरिबांना पीएम आवास योजनेअंतर्गत घरे मिळत आहेत. महायुती स्वप्न पूर्ण करणारी युती होय.
महायुतीला मुंबईकरांचा महत्त्वाचा दळणवळणाचा प्रश्न सोडवायचा आहे. मुंबईमध्ये मोठ्या संख्येने स्टार्टअप येतात. तुमच्या स्वप्नांसाठी माझं आयुष्य समर्पित असल्याचं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. तुमची स्वप्न हाच आमचा संकल्प आहे. मुंबईमध्ये अतिशय वेगाने अशी विकासकामं सुरू आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोदींच्या सभेकडे पाठ फिरवली असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार मंचावर दिसले नाही. अजित पवारांनीही मोदींच्या सभेकडे पाठ फिरवली. सना मलिक आणि झिशान सिद्दिकी गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं.