AIADMK : जयललिता यांच्यानंतर आता "अण्णा द्रमुक" पक्ष कुणाचा? तामिळनाडूतही हाणामाऱ्या
तमिळनाडूत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघममध्ये (अण्णा द्रमुक, AIADMK) वाद उफाळून आला असून, तिथेही पक्ष नेतृत्वाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर नेतृत्वाच्या मुद्द्यावरून या पक्षात निर्माण झालेली दुफळी अजून संपलेली नाही. माजी मुख्यमंत्री ई. के. पळणीस्वामी आणि ओ. पन्नीरसेल्वम या दोघांमध्ये पक्ष कुणाचा, यावरून सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यात जोरदार हाणामाऱ्या, गुद्दागुद्दी सुरू आहे.
तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर AIADMK ने ट्विटरवरील पक्षाचा प्रोफाइल फोटो बदलला आहे. फोटोमध्ये एमजी रामचंद्रन, जयललिता आणि के पलानीस्वामी दिसत आहेत. दरम्यान, AIADMK नेते आणि माजी मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी चेन्नईतील जया मेमोरियल येथे माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांना पुष्पांजली वाहिली. ओ पनीरसेल्वम यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकले . ई पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जनरल कौन्सिलच्या बैठकीत ओ पनीरसेल्वम यांना हटवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पनीरसेल्वम यांनी न्यायालयात धाव घेऊन कायदेशीर लढाई लढून कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले. ते आज पक्ष कार्यालयातून तडकाफडकी बाहेर पडले.
AIADMK कार्यालय सील
पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम यांच्या समर्थकांनी पक्षाच्या कार्यालयात आणि बाहेर हिंसाचार आणि तोडफोड केल्याने सोमवारी महसूल अधिकाऱ्यांनी पक्षाचे मुख्यालय 'एमजीआर मालिगाई' सील केले. पक्ष कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व लोकांना पोलिसांनी हाकलून लावले.
पार्श्वभूमी : इथेही भाजपच!
सत्तेवर असताना केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या मदतीने नेतृत्व आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झालेले माजी मुख्यमंत्री ई. के. पळणीस्वामी आता पुन्हा पकड मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दिशाहीन झालेल्या या पक्षात पळणीस्वामी आणि ओ. पन्नीरसेल्वम या दोघांनी नेतृत्वावर दावा केला. त्यांपैकी कोणालाही यश न आल्याने, दोघेही संयुक्तपणे पक्षनेतृत्व करीत आहेत; मात्र संधी मिळेल तेव्हा दोघेही शक्तिप्रदर्शन करीत असतात. पक्षाची कार्यकारिणी आणि सर्वधारण परिषद या दोहोंची महत्त्वपूर्ण बैठक दोन आठवड्यांपूर्वी झाली होती. यामध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावरून कोणताही निर्णय होऊ नये, म्हणून पन्नीरसेल्वम यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही त्यांच्या बाजूने कौल दिला. प्रत्यक्ष बैठकीत पळणीस्वामी यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. पळणीस्वामी हेच पक्षाचे नेते हवे, अशा मागणीच्या घोषणा त्यांनी दिल्या. या गोंधळामुळे बैठक अर्धवट सोडून पन्नीरसेल्वम निघून गेले; पाठोपाठ त्यांच्या समर्थकांनीही सभात्याग केला होता. पक्षाला पुढे नेण्यासाठी नेतृत्व एकाच व्यक्तीकडे असावे, अशा मागणीचा ठराव या बैठकीत मांडला गेला. त्यावर 2,190 सदस्यांच्या सह्या होत्या. पळणीस्वामी यांची पक्षावरील पकड घट्ट होत असल्याचे आणि एकमुखी नेतृत्वाच्या दिशेने ते पुढे जात असल्याचे यामुळे मानले जाते; मात्र पन्नीरसेल्वम यांनी नेतृत्वावरील दावा सोडलेला नाही. आपण चर्चेला तयार आहेत; दुहेरी नेतृत्वाचा पक्षाला उपयोगच होत आहे, हे त्यांचे याबाबतचे विधान बोलके आहे. सन 2017 मध्ये जयललिता यांच्या निधनानंतर व्ही. व्ही. शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पक्षावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु पन्नीरसेल्वम यांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारले. त्या वेळी पळणीस्वामी मुख्यमंत्री होते. पुढे पन्नीरसेल्वम आणि पळणीस्वामी या दोन्ही गटांचे एकीकरण झाले आणि संयुक्त नेतृत्वाचा प्रयोग सुरू झाला. तो आता संपत असून पक्षावर ताब्यासाठी हाणामारी सुरू झाली आहे.