Akola : अकोला कृषी विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन
अमोल नांदूरकर, अकोला
अकोला कृषी विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील रोजंदार व प्रकल्पग्रस्त मजुरांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवी राठी यांच्यासह जवळपास 500 मजुरांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शेत मजुरांना 500 रुपये रोजंदारी देण्यात यावी व प्रत्येक विभागावर 12 माही काम देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
या अन्नत्याग आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग असल्याचे पाहायला मिळत असून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
सर्व उपोषणकर्ते आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना घेराव घालण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा शेतमजुरांनी निर्णय घेतला आहे.