कोर्टात आरक्षण टिकत नसेल तर आरक्षण कसले देता? ओबीसी नेत्यांचा सवाल
एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे विविध जिल्ह्यात जाहीर सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडून मराठा समाजाला विरोध केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी कल्याणपूर्वक मराठा समाजाची जाहीर सभा घेतली होती याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाज ही आक्रमक झाला आहे.
आज ओबीसी समाज संघटनेचा डोंबिवली जवळील पिंपळेश्वर मंदिरात बैठक होती. या बैठकीत मराठ्यांना ओबीसीमधून कुणबी म्हणून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला. तसेच येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केल्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष दिसून येतोय. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली मधील ओबीसी समाज देखील एकटावले असून लवकरच कल्याणमध्ये जाहीर सभा घेण्याच्या निर्णय देखील या बैठकीत झाला. यावेळी जरांगे पाटलांचा राज हट्ट किंवा बाळ हट्ट सरकारने पुरवु नये, कोर्टात आरक्षण टिकत नसेल तर आरक्षण कसले देता असा सवाल आज ओबीसी समाज संघटनेचे कल्याण तालुका अध्यक्ष विश्वनाथ जाधव यांनी केला.