"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
२०१९ ला दिल्लीत सातच्या सात जागांवर भाजप विजयी झाला होता. दिल्लीलाही वाटलं होतं, मोदींचं सरकार आणलं पाहिजे, पण आता २०२४ मध्ये भाजपच्या हुकूमशाहा वृत्तीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यामुळे या निवडणुकीत सातपैकी सात सीट काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जिंकणार, हे पक्क ठरलेलं आहे. पाच वर्षापूर्वी ३७० कलम हटवलं होतं, जम्मू, काश्मीर, लडाख अशी वेगवेगळी राज्ये झाली. आपल्याला वाटलं होतं, काश्मीरचं चांगलं होईल. ३७० कलम काढायला आमचाही पाठिंबा होता. आपणही तो क्षण साजरा केला होता. पण आजा पाच वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे. दहशतवाद अजून संपला नाही. एअर फोर्सच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. देशाची सुरक्षा यंत्रणा आणि गृहखाते काय करत होतं? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारसभेत सांगलीत बोलत होते.
जनतेला संबोधीत करताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे, हे पक्क झालं आहे. कदाचित भाजपचे लोक तुमच्या घरी प्रचारासाठी येतील. भाजपच्या बी टीममधील अपक्ष उमेदावरही तुमच्याकडे प्रचारासाठी येतील. तुम्हाला सांगतील, तुम्ही शिवसेना आणि महाविकास आघाडीला का मतदान करता, त्यांनी जर सांगितलं भाजप ४०० पार होत आहे, तुम्ही त्यांना विचारा, ४०० पार कुठून होणार आहेत, हे आधी आम्हाला सांगा. महाराष्ट्रात तर ४०० पारचं चित्र नाही.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं, पण कुठेही ४०० पारचं वातावरण नाही आहे. इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत बसत आहे, अशीच लाट देशभरात निर्माण झाली आहे. भाजप साऊथमध्ये साफ आणि नॉर्थमध्ये हाफ, असा नारा काँग्रेस देत आहे. दक्षिण भारतात ना केरळमध्ये, ना तामिळनाडूत त्यांना सीट मिळणार. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातही त्यांचे उमेदवार विजयी होणार नाहीत.
देशभरात आणि महाराष्ट्रात राजकीय उष्णता वाढलीय. पण खरी उष्णताही खूप वाढली आहे. काही तापमान ४३ डिग्रीपर्यंत पोहोचलं आहे. गेल्या दोन महिन्यात मी पाहिलंय, महाराष्ट्राचं असं वैशिष्ट्य आहे की, तापमान कितीही वाढलं तरी महाविकास आघाडीच्या सर्व सभांना जनता आशीर्वाद द्यायला येत आहे. म्हणून आपला विजय होणार म्हणजे होणारच. काही ठिकाणी लोक उष्णतेत तासनतास सभेसाठी थांबलेली असतात.
हे केंद्र सरकार आणि भाजप सरकार आम्ही बदलतोय कधी, याच गोष्टीची लोकांना भुख-तहान लागली आहे. इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत बसण्याची सर्व जनतेची इच्छा असल्याचं सभांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरात वेगळं वातावरण निर्माण झालं आहे. सर्व ठिकाणी परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.