आज मंत्रीपद भुषवणारे आदित्य ठाकरे कधीकाळी होते गाणी लिहिण्यात व्यस्त
राज्याच्या राजकीय पटलावरचं एक महत्वाचं नाव म्हणजे ठाकरे! प्रभोदनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे...ठाकरे कुटुंबाची अशी ही चौथी पिढी आज आपल्या क्षेत्रात दमदार कामगिरी करताना दिसतेय. ठाकरे परिवाराचे विचार आणि भूमिका या वेळेनुसार बदलत गेल्याचं पाहायला मिळतंय. प्रभोदनकारांची पुरोगामी भूमिका, बाळासाहेब ठाकरेंची कट्टर हिंदुत्वादी भूमिका त्यानंतर उद्धव ठाकरेंचं 'हाताला काम देणारं हिंदुत्व' हे जरी चर्चेचं कारण असलं तरी चौथी पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे यांनी मात्र आपली वेगळी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केलाय. याच आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस. ठाकरे कुटुंबाचे वारस आणि सध्याचे पर्यावरण मंत्री यापलिकडे आदित्य ठाकरेंची ओळख काय? हे जाणून घेऊ.
आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विशेष बाब म्हणजे, ठाकरे कुटुंबातले ते पहिले सदस्य आहेत, ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. यापूर्वीच युवा सेना प्रमुख म्हणून ते राजकारणात आलेले होते. २०१९ साली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर ते आमदार झाले आणि थेट पर्यटन मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. सध्या ते याच पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र अनेकांना माहिती नसेल की आदित्य ठाकरे राजकारणात येण्यापूर्वी कविता आणि गाणे लिहीण्यात व्यस्त होते.
आदित्य ठाकरे यांचा 'माय थॉट्स इन व्हाईट ब्लॅक' हा आपला पहिला कवितासंग्रह २००७ साली प्रकाशित झाला होता. त्यानंतर त्यांनी गाणी लिहायला सुरुवात केली. त्यांनी गीतकार म्हणून उम्मीद हा आपला पहिला अल्बम प्रसिद्ध केला. या अल्बममध्ये तब्बल ८ गाणी आदित्य ठाकरेंनी लिहीली होती. यामध्ये एक खोज, जा जा संदेसा, हलके-हलके, उम्मीद, बिखारा, जलने दे, वो मुझको, बुलाले अशी अनेक गाणी त्यांनी लिहीली.
आदित्य ठाकरे यांनी लिहीलेल्या गाण्यांना कैलाश खेर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, महालक्ष्मी ऐय्यर, कुणाल गांजावाला, सुनिधी चौहान, अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, वैशाली सावंत अशा अनेक दिग्गज कलाकारांनी आवाज दिला होता.