MI विरुद्ध CSK सामन्याआधी माजी दिग्गज खेळाडूचं मोठं विधान; म्हणाला, "प्रत्येकाला वाटतंय धोनीनं..."
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज सायंकाळी वानखेडे मैदानात सामना रंगणार आहे. परंतु, या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा टी-२० वर्ल्डकप विजेता कर्णधार अॅरोन फिंचने एम एस धोनीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएल २०२४ मध्ये धोनीनं वरच्या क्रमाकांवर फलंदाजी करावी, असं प्रत्येकाला वाटतंय. वरच्या स्थानावर फलंदाजी केल्यामुळं धोनीला जास्त चेंडू खेळता येतील, असं फिंचने म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना फिंचने म्हटलं, धोनीनं जास्तवेळ फलंदाजी करावी आणि टॉप ऑर्डरमध्ये खेळावं, अशी सर्वांचीच इच्छा आहे, असं मला वाटतं. तो फलंदाजी करायला आल्यावर चाहत्यांमध्ये कमालीचा जल्लोष पाहायला मिळतो. धोनीला आणखी किती वेळ फलंदाजी करताना पाहता येईल, याबाबत चाहत्यांना विश्वास नाहीय. धोनी मुंबई इंडियन्सला आव्हान देण्यासाठी तयार असणार. धोनीला सर्वात जास्त समर्थन मिळेल, यात काही शंका नाही.
या हंगामात धोनी खूप खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. त्यामुळे त्याला फक्त तीनवेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरोधात झालेल्या सामन्यात धोनीनं १६ चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर धोनीनं वरच्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असा सूर चाहत्यांकडून उमटू लागला.
केकेआर विरोधात झालेल्या सामन्यात धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला ३ चेंडूच खेळायला मिळाले. पण, चेन्नईने त्या सामन्यात विजय संपादन केलं होतं. धोनीने या हंगामात आतापर्यंत २१ चेंडूत ३९ धावा केल्या आहेत. ४२ वर्षांचा धोनी फलंदाजीसाठी उतरतो, तेव्हा स्टेडियममध्ये उत्साहाची लाट पसरलेली असते.