"...तर सरकार बदललं असतं"; EVM मशिनबाबत पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
Aaditya Thackeray Press Conference : महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याविरोधात ४८ मतांनी विजयी झाले. परंतु, वायकरांच्या विजयावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. वायकरांच्या नातेवाईकाने मोबाईल फोनद्वारे ईव्हीएम हॅक केला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तसच सरकार आणि राज्य निवडणूक आयोगावरही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत. यावर निवडणूक आयोगाच्या रिटर्निंग ऑफसर वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं होतं की, ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपीचा वापर होत नाही. अशातच आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
फोनवर ओटीपी आला होता का, कक्षात कुणी फोन घेऊन गेला होता का, यासंदर्भात मीडियात वेगवेगळे रिपोर्ट्स येत आहेत. कोर्टाची लढाई सुरु होणारच आहे. आम्ही ही जागा जिंकलेलो आहोत. ही जागा हक्काची आहे. हुकूमशाहीविरोधात मुंबईकरांनी जो निकाल दिला आहे, तो जगजाहीर आहे. पण यात काही गडबड झाली आहे. यातील तंत्रज्ञानाविषयीच्या गोष्टी समोर आणायच्या आहेत. आमच्यासोबत पक्ष आणि चिन्हाविषयी जो निकाल दिला होता, त्यावेळी निवडणूक आयोग साटेलोटं करत असल्याचं आम्ही म्हटलं होतं. हे आयोग कोणत्या पक्षाच्या कार्यालयातून चालतं का? असा प्रश्नही काही नेत्यांनी उपस्थित केला होता. ही सर्व गडबड करुन देखील इंडिया आघाडीने चांगले आकडे प्राप्त केले आहेत. जर ही गडबड नसती झाली, तर सरकार बदललं असतं.
निवडणुकांचे निकाल आल्यानंतर हा विषय देशभरात गाजत आहे. जगभरात याची चर्चा होत आहे. ईव्हीएम किती सुरक्षित आहेत, ते मशिन वापरायला पाहिजे की नाही, यावर एलॉन मस्त स्वत: बोलत आहेत. मुंबई उत्तर पश्चिमची जागा जगभरात चर्चेत आहे. आमचे जिंकलेले खासदार अमोल किर्तीकर यांच्या जागेबाबत ४ तारखेलाच पुढे मागे चाललं होतं. कधी असं वाटलं की एक मताने जिंकले, तर कधी वाटलं ६०० मतांनी जिंकले, मग सीट आपल्या हातातून गेली कशी? काय गडबड झाली? त्यानंतर ५ जूनपासून याविषयी चर्चा सुरु आहे.
काय म्हणाले अनिल परब ?
४ जूनला जो निकाल लागला, त्यात आमचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला. हा पराभव संशयास्पद आहे. याच्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. निवडणुकीची एक प्रक्रिया असते. या प्रकियेद्वारे निवडणूक होत असते. यावेळी निवडणुकीच्या प्रक्रियेला पूर्णपणे हरताळ फासलं आहे. निवडणुकीची प्रक्रिया डावलली गेली आहे. १९ व्या फेरीनंतर निकाल जवळ येत होता. त्यावेळी निकालाबाबतची पारदर्शकता बंद झाली. कोणत्याही मतदानाचा एक फेरी पूर्ण झाल्यावर उमेदवाराल मिळालेल्या मतांची घोषणा होते.
१९ व्या फेरीपर्यंत या सर्व फेऱ्या लोकांसाठी सांगितल्या जायच्या. रिटर्निंग ऑफिसरच्या टेबलजवळ पक्षाचा प्रतिनिधी असतो. उमेदवारांच्या समोर आकडेवारी टॅली केली जाते. त्यानंतर ती त्या अधिकाऱ्याकडे जाते. आमच्या प्रतिनीधीत आणि एआरओच्या टेबलपर्यंत खूप जास्त अंतर ठेवलं होतं. ते अधिकारी कोणता हिशोब पाठवत होते, हे आम्हाला कळलं नाही. आम्हाला कोणतीच माहिती दिली नाही. माहिती न देताच निकाल जाहीर केला.