दिल्लीवरून पुण्याला निघालेल्या तरुणीवर रेल्वे प्रवासात काळाची झडप
चुलत बहिणीच्या साखरपुड्याला दिल्ली वरून संपर्क क्रांती एक्सप्रेसने पुण्याकडे निघालेल्या २५ वर्षीय तरूणीवर, रेल्वे प्रवासादरम्यान काळाने झडप घातल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकावर ही घटना समोर आली आहे. वाघिषा संजय पोतेदार वय -२५ असे तरुणीचे नाव असून मृत तरुणी ही मूळची राजस्थान राज्यातील कोटा येथील रहिवासी आहे, प्रवासादरम्यान तरुणीची प्रकृती बिघडल्याने यातच तरुणीचा हा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
राजस्थान मधील कोटा येथील रहिवासी वाघिषा संजय पोतेदार ही २५ वर्षीय तरुणी २० जुलै रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी हजरत निजामुद्दीन (दिल्ली) रेल्वे स्थानकावरुन कर्नाटका संपर्क क्रांती एक्स्प्रेसने चा वातानुकूलित बोगितून प्रवास करत पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यासाठी निघाली होती. मात्र, बुऱ्हाणपूर ते भुसावळ दरम्यान वाघिषा हिची प्रकृती अचानक बिघडल्याने याबाबत तरुणीने बोगी असिस्टंट ला माहिती देत आरोग्य सेवा मागितली.
त्यानुसार भुसावळ रेल्वे स्थानकावर डॉक्टरांनी तरुणीची तपासणी करत औषध उपचार केले. पुढील प्रवासास रवाना केले. मात्र, भुसावळ ते पाचोरा रेल्वे स्थानकादरम्यान वाघिषा हिची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे संपर्क क्रांती एक्स्प्रेसला पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आले. घटनेची माहिती कळताच पाचोरा काँग्रेसचे पदाधिकारी सचिन सोमवंशी हे देखील तात्काळ रेल्वे स्थानकावर दाखल झाले. वाघिषा हिला लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोराचे हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार, आरपीएफ पाटील, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केले.
सचिन सोमवंशी यांनी तात्काळ वाघिषा हिच्या परिवारास घटनेची माहिती कळविल्यानंतर वाघिषा हिचे आई, वडिल हे पुण्याहुन पाचोरा येथे दाखल झाले. रुग्णालयात आपल्या मृत मुलीला पाहताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे वाघिषा चा मृत्यू, काँग्रेसचे पदाधिकारी सचिन सोमवंशी यांचा आरोप. कोटा राजस्थान येथील रहिवासी वाघिषा ही दिल्लीत खाजगी नोकरी करत होती. दिल्लीहुन पुणे येथे संपर्क क्रांती एक्स्प्रेसने वाघिषा एकटीच निघाली होती. बुऱ्हाणपूर ते भुसावळ रेल्वे स्थानकादरम्यान वाघिषा हिची प्रकृती अचानक बिघडली. भुसावळ रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस दाखल झाली असता रेल्वेचे डॉक्टरांनी वाघिषा हिस रुग्णालयात दाखल करुन न घेता मेडिसीन देवुन पुढील प्रवासासाठी रवाना केले. मात्र याच वेळी जर वाघिषा हिस रेल्वेच्या डॉक्टरांनी भुसावळ येथील रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार केले असते तर कदाचित वाघिषा हिचे प्राण वाचु शकले असते. त्यामुळे रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसचे पदाधिकारी सचिन सोमवंशी यांनी केला आहे.