खड्ड्यात उसाची लागवड करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन
संजय देसाई, सांगली: सांगली पेठ रस्ता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या रस्त्यावर खड्यात उसाची लागवड केली आणि वृषारोपण करण्यात आले आहे. सदर रस्ता तात्काळ झाला नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडून घालू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावेळेस दिला आहे.
हा रस्ता गेली अनेक वर्षे खराब आहे. इतके खड्डे आहेत की रस्ता आहे की माळराण आहे अशी परिस्थिती आहे. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेक महिला रस्त्यातच प्रसूती झाल्या आहेत. वारंवार आंदोलन करूनही रस्त्याचे काम उत्कृष्ट होत नाही. केवळ डागडुजी केली जाते. लोकाचा वेळ ,पेट्रोल, डिझेल मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. हा रस्ता राज्य शासनाकडे की केंद्राच्या हायवे प्राधिकरणाकडे आहे. या वादात रखडला आहे. पण यामुळे सर्वसामान्य माणसाचा जीव चालला आहे. त्याला जबाबदार कोण असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज चक्करस्त्याच्या खड्ड्यामध्ये उसाची लागवड करून प्रशासनाचा निषेध केलेला आहे.