उत्तर प्रदेशातील गोंडा येथे भीषण रेल्वे अपघात; चंदीगड-डिब्रुगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे गुरुवारी दुपारी एक मोठा रेल्वे अपघात झाला. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांची संख्या अद्याप समजू शकली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी तात्काळ बचाव, मदत कर्मचारी तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत, असं मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितले.
या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. गोरखपूर रेल्वे विभागाच्या मोतीगंज सीमेवर ही घटना घडली. अपघातामागील कारण अद्याप समजू शकलं नाही.
रेल्वे अधिकाऱ्यांशिवाय पोलिस प्रशासनाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. वैद्यकीय पथकालाही पाचारण करण्यात आले असून डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अपघातानंतर मार्गावर येणाऱ्या गाड्या विस्कळीत झाल्या आहेत. अपघातग्रस्त ट्रेनची संख्या 15904 आहे. दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाल्याचे एका प्रवाशाने सांगितले. ही ट्रेन चंदीगडहून निघाली होती आणि गोंडापासून २० किलोमीटर पुढे हा अपघात झाला. दोन बोगी पूर्णपणे रुळावरून घसरल्या. रुळही उखडले होते. अपघातग्रस्त ट्रेनमधून लोक मोठ्या मुश्किलीने बाहेर आले.