घरात घुसलेला बिबट्या चिमुकल्यामुळे झाला जेरबंद; नेमकं काय घडलं?
मालेगाव शहरातील नामपूर रोडवरील एका लॉन्समध्ये बिबट्या शिरला होता. यावेळी मोहित विजय आहिरे या लहान मुलाने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला लॉन्समध्ये एका खोलीत जेरबंद केले. शहरातील भायगाव, जाजुवाडी परिसरातील साई सेलिब्रेशन लॉन्समध्ये ही घटना घडली. बिबट्याला रेस्क्यु करण्यासाठी वनविभाग, पोलीस, अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्या लॉन्समध्ये शिरल्याची माहिती मिळताच त्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नाशिक येथील रेसक्यू टीमसह स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ब्लो पाईपद्वारे डॉट देत बिबट्याला भुल दिली. बिबट्या बेशुद्ध होताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जेरबंद केले. हा बिबट्या नर जातीचा असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास लोणकर मळ्यात भक्ष्याच्या शोधात एक बिबट्या आला असता भटक्या कुत्र्यांनी भूंकण्यास सुरुवात केली आणि अखेर बिबट्याने इथून पळ काढला.