जगभरातील 95 टक्के लोकांना आरोग्याची समस्या; लोक वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त
आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात आजार आणि रोगांचा प्रसार या गोष्टी अटळ आहेत. त्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्यांशी कायम तोंड द्यावे लागत आहे. देश गरीब असो किंवा श्रीमंत, सर्वत्र रुग्णालयांत गर्दी वाढत आहे. एखाद्या डॉक्टरची भेट घेणे एक आव्हानच ठरत आहे. या पार्श्वभूमीवर 'सायन्स डायरेक्ट'चा प्रसिद्ध झालेला एक अहवाल अत्यंत धक्कादायक असून, यानुसार जगातील 8.2 अब्ज लोकसंख्येत केवळ 4.3 टक्के लोकच पूर्ण निरोगी आहेत.
या अहवालानुसार, 95 टक्क्यांहून अधिक लोकांना आरोग्याच्या समस्या आहेत, तर विविध आजारांनी ग्रस्त सरासरी 33 टक्के लोकांना पाच वेगवेगळ्या आजारांशी तोंड द्यावे लागत आहे. 'द लॅन्सेट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज'च्या 2013 मधील अभ्यासानुसार जगातील फक्त 4.3 टक्के लोकसंख्या अगदी निरोगी आहे. गेल्या काही दिवसांत, विशेषतः कोविड-19 च्या उद्रेकानंतर तर परिस्थिती अधिकच वाईट असून, आरोग्याच्या समस्या असलेल्यांची संख्या आणखी वाढलेली असू शकते.
मणक्यांचे दुखणे, नैराश्य, रक्तक्षय, घसा खवखवणे आणि कर्णबधिरपणा यांचे प्रमाण प्रचंड असून, 50 टक्के लोकांच्या तब्येती स्नायू आणि हाडांच्या विकारांमुळे ढासळत आहेत. मानसिक अनारोग्य किंवा अति औषधी सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाचाही यात समावेश आहे.