"50 जण गद्दार कसे? आम्ही केलं त्याला धाडस म्हणतात", उदय सामंतांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
राज्यात शिवसेना आमदारांची बंडखोरी झाल्यानंतर राज्यात सत्तापालट झाला. शिवसेना हा पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाचं की एकनाथ शिंदेंच्या गटाचं हा वाद न्यायालयात आहे. दरम्यान, या सगळ्या सत्तानाट्यामध्ये शिवसेना आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कमान सांभाळण्यासाठी फ्रंटफूटवर दिसत आहेत. आदित्य हे राज्यभर शिवसंवाद यात्रा घेत आहेत. काल आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेसाठी उदय सामंतांचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी येथे दौऱ्यावर होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आता उदय सामंत यांनी ट्वीट करून प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य यांची टीका:
काल रत्नागिरी दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारवर टीकास्त्र डागलं. विशेषत: शिंदे गटातील नेत्यांवर आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली. सध्या राज्याचे उद्योगमंत्री असलेल्या उदय सामंत यांच्या मतदार संघात आदित्य यांनी जनतेला "उद्योगमंत्री कोण आहे?" असा सवाल विचारला असता जमावाने "गद्दार" असं उत्तर दिलं.
उदय सामंतांचं प्रत्युत्तर:
"आमच्या मतदारसंघात येऊन आम्हाला "गद्दार" म्हणण्यापेक्षा..मा. एकनाथजी शिंदे यांनी वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ठरवले हे योग्य की अयोग्य ते सांगावे..काँग्रेस, एनसीपी बरोबर जाऊ नये हा बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारे पन्नास जण "गद्दार"कसे..ह्याला धाडस म्हणतात." असं ट्वीट उदय सामंत यांनी केलं आहे.