कल्याण डोंबिवलीत स्वाईन फ्लूचे 48 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू
कल्याण (अमजद खान) - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झालेला असताना, आता स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. महापालिका हद्दीत जूनपासून आतापर्यत स्वाईन फ्लूची लागण झालेले ४८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २२ असून उपचार घेऊन डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या २४ आहे. (48 cases of swine flu in Kalyan Dombivli, two deaths)
स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्यांमध्ये व्याधीग्रस्त एक ८५ वर्षीय वृद्ध होता. तर दुसरी ५२ वर्षी महिला होती. स्वाईन फ्लूची वाढती रुग्ण संख्या पाहता महापालिकेच्या वतीने जनजागृती मोहिम राबवली जात आहे. नागरीकांना सर्दी, खोकला, घसा दुखी, ताप ही लक्षणे आढलून आल्यास त्यानी स्वत:ला आयसोलेट करावे. गर्दीत जाऊ नये, मास्कचा वापर करावा. तसचे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी केले आहे.
महापालिकेच्या रुक्मीबाई, शास्त्रीनगर, वसंत व्हॅली येथील रुग्णालयात स्वाईन फ्लू करीता लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. ही लस दुस:या व तिस:या महिन्यातील गरोदर महिला, उच्च रक्तदाब आणि मधूमेह असणाऱ्या व्यक्ती, फ्लू रुग्णांची तपासणी, देखभाल, उपचारात सहभागी असलेल्या डॉक्टर नर्सेस कर्मचारी यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
स्वाईन फ्लूची लस कोराना लसीसोबत घेण्यात येऊ नये. कोरोना व स्वाईन फ्लू यांच्या लसीत किमान दोन आठवडय़ांचे अंतर असावे. स्वाईन फ्लूची लस घेतल्यावर लस घेणाऱ्या व्यक्तिच्या शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण होण्यास दोन आठवडय़ांचा कालावधी लागतो. लसीमुळे मिळालेली प्रतिकार शक्ती ही एक वर्षापर्यंत टिकू शकते. त्यामुळे ही लस दरवर्षी घेणेआवश्यक आहे.