कोल्हापूर जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदांसाठी 2702 अर्ज दाखल
विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली होती. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सर्वच तालुक्यातून मोठी गर्दी झाली.
कोल्हापूर शहराच्या वेशीवरील गावांमध्येही निवडणूक होत असल्याने वेगळीच चुरस निर्माण झाली आहे. अनेक मोठ्या गावांनाही थेट जनतेमधून सरपंच मिळणार आहे.निवडणूक स्थानिक पातळीवर आणि गल्लीच्या राजकारणावर होत असल्या, तरी थेट सरपंच निवड असल्याने आपला गट मजबूत करण्यासाठी आजी माजी आमदार तसेच खासदारही सक्रीय झाले आहेत.
जिल्ह्यात 474 ग्रामपंचायतींमध्ये 2677 सरपंचपदासाठी, 16 हजार 691 अर्ज सदस्यपदासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, दाखल अर्जांची सोमवारी 5 तारखेला छाननी होणार आहे. बुधवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे. 7 डिसेंबर रोजी दुपारी तीननंतर चिन्हे वाटप केली जातील. मतदान 18 डिसेंबर, तर मतमोजणी 20 डिसेंबरला होईल.