मोहम्मद पैगंबरांबद्दल तुम्ही खरं बोललात; नुपूर शर्मांना नेदरलँडच्या खासदाराचा पाठिंबा
भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरूच आहे. नेदरलँड्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य आणि पार्टी फॉर फ्रीडम, नेदरलँडचे अध्यक्ष गीर्ट वाइल्डर्स यांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. खासदार गीर्ट वाइल्डर्स यांचं विधान सध्या चर्चेत आहे. भारताने इस्लामिक देशांची माफी मागण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
भारत माफी का मागतोय?
एका ट्विटमध्ये गीर्ट वाइल्डर्स म्हणाले की, तुष्टीकरण कधीही योग्य ठरत नाही. यामुळे फक्त वातावरण खराब होतं. तेव्हा माझ्या भारतातील प्रिय मित्रांनो, इस्लामिक देशांना घाबरू नका. स्वातंत्र्यासाठी उभं राहा आणि अभिमान बाळगा. मोहम्मद पैगंबरांबद्दल सत्य बोलणाऱ्या तुमच्या नेत्या नुपूर शर्मांचं रक्षण करण्याचा निर्धार करा.
त्यांनी पुढे असंही म्हटलं की, प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल खरं बोलल्यामुळे अरब आणि इस्लामिक देश भारतीय नेत्या नुपूर शर्मा यांच्यावर नाराज आहेत हे हास्यास्पद आहे. आयशा सहा वर्षांची असतानाच तिने लग्न केलं. मग भारत माफी का मागतोय?
गीर्ट वाइल्डर्सला जीवे मारण्याची धमकी?
खासदार गीर्ट वाइल्डर्स हे उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे नेते आहेत. आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. रोज मला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच धमक्या देऊन काही होणार नाही कारण मी सत्य बोलणं थांबवणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय.