अहमदनगर : जिल्ह्यात चार वर्षाच्या मुलावर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोनार बाबा असे आरोपीचे नाव आहे. या घटनेचे संतप्त पडसाद परिसरात उमटले आहेत.
माहितीनुसार, जिल्ह्यातील गांधीनगर येथील बोल्हेगांव परिसरातील एका चार वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलगा दुकानात गेला असता शेजारच्या सोनार बाबा नावाच्या व्यक्तीने त्याला स्वतःच्या घरात नेऊन अत्याचार केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सोनार बाबाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ही बातमी परिसरात पसरताच जमावाकडून आरोपीला मारहाण करण्यात आली. यामध्ये आरोपी गंभीर जखमी झाला असून आरोपीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.