राज्यसभेच्या रणधुमाळीत रंगणार महाडिक विरुद्ध पवार सामना
राज्यसभेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकांच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली असून, त्यासाठी आता भाजप विरुद्ध शिवसेना असा रंगणार आहे. त्यावर आता सर्व पक्षांची बैठक पार पडली असून, राज्यसभा बिनविरोध करण्याचे महाविकास आघाडीचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याचं पाहायला मिळतंय. सहा जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शिवसेनेचे प्रत्येकी एक भाजपचे दोन आणि शिवसेनेचे दोन असे उमेदवार येणं अपेक्षित होतं. मात्र आता भाजपने धनंजय महाडीक यांची उमेदवारी मागे न घेतल्यानं निवडणूक बिनविरोध होणार नाही हे निश्चित आहे.
भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही माघार न घेतल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. सहाव्या जागेवरून भाजपने धनंजय महाडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे. निवडणुकीच्या राजकारणात दोन्ही बाजूने आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करत आहेत. आमच्याकडे तिसऱ्या उमेदवारासाठी 30 मते जादा आहेत. त्यामुळे आता अपक्ष, इतर पक्षांच्या मदतीवर आम्ही तिसरा उमेदवार निवडून आणू असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून आता चुरस वाढली आहे. उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी कुणीही अर्ज मागे न घेतल्यानं आता येत्या 10 जून रोजी राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यसभेची उमेदवारी मागे घ्या विधान परिषदेची जागा सोडू असा प्रस्ताव दोन्हीकडून एकमेकांना देण्यात आला. परंतु राज्यसभेची उमेदवारी मागे न घेण्यावर मविआ आणि भाजपा ठाम राहिल्याने काहीही तोडगा निघू शकला नाही. आता अर्ज भरण्याची मुदत संपल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.