लोकशाहीचा ऑनलाइन सर्व्हे : महागाई, रोजगार निर्मितीत अपयशानंतरही जनतेला पुन्हा मोदीच पंतप्रधान हवेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी (modi government) यांच्या दुसऱ्या कार्यकाळास ३० मे रोजी तीन वर्ष पुर्ण होत आहे. यापुर्वी मोदी सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला होता. यानंतरच्या तीन वर्षांत जनतेला मोदी सरकारची कामगिरी कशी वाटली? यासंदर्भात ऑनलाइन सर्व्हे ''लोकशाही''ने केला. त्यानुसार जनता मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी असली तरी महागाई व रोजगार निर्मिती करण्यास सरकार अपयशी ठरल्याचे मत सर्व्हेतून व्यक्त केले. परंतु मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यास जवळपास ५० टक्के जनतेने होकारर्थी मत नोंदवले आहे. दुसरीकडे तब्बल ३८ टक्के लोकांना मोदी पुन्हा पंतप्रधान नको आहेत. पाहू या ''लोकशाही''ने विचारलेल्या पाच प्रश्नातून जनतेची मते...
मोदी सरकारची तीन वर्षांची कामगिरी कशी वाटते?
मोदी सरकारची तीन वर्षांची कामगिरीवर जनता समाधानी दिसत आहे. 43.1 टक्के जनतेने या कामगिरीस उत्तम म्हटले आहे. 24.8 टक्के जनतेने मोदी सरकारला पास करत साधारण कामगिरी असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी 32.1 टक्के नागरिक सरकारच्या कारभारावर पुर्णपणे नाराज आहेत. अजून निवडणुकीस दोन वर्षांचा कालावधी असला तरी एंटी इंकम्बेंसी वाढत जाईल आणि ही टक्केवारी वाढेल. यामुळे पुढील दोन वर्ष सरकारकडून अजून मोठ्या अपेक्षा जनतेला आहे.
मोदी सरकार महागाई रोखण्यास यशस्वी ठरले का?
मोदी सरकार येण्यापुर्वी एप्रिल 2014 मध्ये पेट्रोल 72 तर डिझेल 55 रुपये लिटर होते. परंतु 2022 मध्ये ही किंमत पेट्रोलची किंमत 120 रुपयांवर तर डिझेल 105 रुपयांवर पोहचले. गृहिणींसाठी महत्वाचा विषय असणारा गॅस सिलेंडरने हजाराचा वर टप्पा गाठला आहे. यामुळे महागाईचा दर वाढला आहे. मोदी सरकार महागाई रोखण्यास अपयशी ठरल्याचे मत 59.1 टक्के जनतेने व्यक्त केले आहे. 34.3 टक्के जनतेने महागाई रोखण्यात सरकार यशस्वी ठरल्याचे म्हटले आहे. 6.6 टक्के जनता तटस्थ राहिली आहे.
सरकारचे सर्वात मोठे यश कोणते?
मोदी-2 सरकारचे सर्वात मोठे यश काय? या प्रश्नाच्या उत्तरात तीन पर्याय देण्यात आले होते. त्यात धार्मिक, राष्ट्रीय आणि आरोग्याचा विषय होता. या प्रश्नाच्या उत्तरात जनतेने राष्ट्रीय मुद्याला प्राधान्य देत 370 कलम रद्द करणे मोदी-2 सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचे म्हटले आहे. तब्बल 45.3 टक्के नागरिकांनी 370 कलम रद्द करणे सर्वात मोठे यश असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर दोन वर्ष ज्या कोरोनाच्या दहशतीखाली गेले त्या कोरोना लसीकरणचा मुद्यास 38.7 टक्के लोकांनी दुसरे यश म्हटले असून राम मंदिराचा प्रश्नाला 16.1 टक्के जनतेने मोठे यश म्हटले आहे.
सरकार कोणत्या गोष्टीत अपयशी ठरले?
मोदी-2 सरकारच्या काळात महागाई दर सर्वोच्च गेला असला तरी रोजगार निर्मिती झालेली नाही, असे मत अनेकांनी नोंदवले आहेत. मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश रोजगार निर्मिती न होणे असल्याचे मत तब्बल 73 टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे मत 18.2 टक्के जनतेने मांडले आहे. तर 8.8 टक्के लोकांनी कोरोना मृत्यू रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे मत व्यक्त केले आहे. यामुळे रोजी-रोटीला सामान्यजनता सर्वात जास्त महत्व देत असल्याचे दिसून येते.
पुन्हा निवडणुका झाल्यास मोदींची पंतप्रधान म्हणून निवड करणार का?
पुन्हा निवडणुका झाल्यास मोदींची पंतप्रधान म्हणून निवड करणार का? या शेवटच्या प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिसून आली. महागाई रोखण्यास अपयश, रोजगार निर्मितीत अपयश आल्यानंतरही मोदी यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून पाहण्यास 49.6 टक्के जनतेने होकार दिला आहे. दुसरीकडे 37.2 टक्के जनतेला मोदी पुन्हा पंतप्रधान नको आहेत. 13.1 टक्के जनता या प्रश्नावर तटस्थ राहिली आहे.
निष्कर्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 2014 मध्ये शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. जनतेशी संवाद साधण्याचे कौशल्य त्यांच्यात चांगले आहे. उत्तम वक्ते आहेत. यामुळे सरकारने केलेल्या कामगिरीचा गवगावा मोठ्या प्रमाणावर त्यांच्यांकडून केला जातो. आठ वर्षांच्या सत्तेनंतर येणाऱ्या एंटी इंकम्बेंसीनंतरही जनतेत मोदी लोकप्रिय आहेत. उर्वरित दोन वर्षांत सरकारने आता सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर लक्ष दिले पाहिजे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. यामुळे आता मुख्यत: रोजगार निर्मिती वाढवण्यावर सरकारने भर दिला पाहिजे आणि महागाई रोखण्यासाठी उपयायोजना केली पाहिजे, असे निष्कर्ष ऑनलाइन सर्व्हेक्षणातून दिसून येत आहे.