"इंधनाच्या किंमती आधी वाढवायच्या अन् नंतर..."; CM ठाकरेंचा केंद्रावर निशाणा
मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol-Diesel Price) अबकारी कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच आता पेट्रोल आणि डिझेलवरील दर कमी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून होत असणाऱ्या भाववाढीनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावरुन केंद्रावर निशाणा साधला आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करुन सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे. देशातील अनेक राज्यांत पेट्रोलचे दर हे अत्यंत वाढले असून, मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या खिशाला फटका या दरवाढीमुळे बसत होता. त्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार पेट्रोलचे दर साडेनऊ रुपये तर डिझेलचे दर ७ रुपयांपर्यंत कमी होणार असल्याची शक्यता आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावरुन केंद्रावर निशाणा साधला आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना न अडकवता ६-७ वर्षांपूर्वीच्या अबकारी कराइतकी कपात केल्यास देशातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे.