राज ठाकरेंचा पुणे दौरा; 'वसंत मोरे अन् नाराजी नाट्याचा' निकाल लावणार?
पुणे | अमोल धर्माधिकारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या पुन्हा नव्या भूमिकेसह मैदानात उतरले असून, हिंदुत्वाचा (Hinduism) मुद्दा घेऊन ते सध्या सक्रिय झाले आहे. त्यातच आता राज ठाकरे पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका ते घेणार आहेत. मनसेच्या (MNS) रविवारी झालेल्या पदाधिकारी मेळाव्याचा आढावा राज ठाकरे घेणार असून, पुण्यातील सभेबाबत देखील चर्चा सुरु आहेत. अद्याप सभेची तारीख ठरलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरे हे नाराज असून, त्याची मोठी चर्चा सुरु आहे. आता राज ठाकरे स्वतः पुढाकार घेऊन पुण्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणतील आणि वसंत मोरेंच्या नाराजी नाट्याचा निकाल लावतील अशी देखील शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या दौऱ्यात ते पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहेत. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली तेव्हापासून मनसे कामाला लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्यापासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या नाराजी नाट्य सुरु असून, त्याच मुद्यावर राज ठाकरे हा दौरा करतील अशी शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पुणे शहरातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यात मागील काही दिवसांपासून बेबनाव झाल्याचं दिसून येतंय. याच पार्श्वभूमीवर शहरातील पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन त्यांच्यात समन्वय देखील घडवून आणण्यासाठी राज ठाकरे काम करतील अशी देखील चर्चा सुरू आहे. याशिवाय राज ठाकरे यांनी आगामी काही दिवसात पुणे शहरात जाहीर सभा देखील होण्याची शक्यता आहे. त्या सभेचे नियोजन देखील राज ठाकरेंच्या या दौऱ्यात केले जाण्याची शक्यता आहे.