नवनीत राणा यांना कोर्टाची नोटीस : तुमचा जामीन रद्द का करु नये
मुंबई
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर हनुमान चालीसा लावल्याप्रकरणात जामीनावर असलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना सत्र न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. जामीन सशर्त असतांना माध्यमांशी संवाद साधल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यात तुमचा जामीन रद्द का करु नये, अशी विचारणा केली आहे.
कोर्टाने नोटीस दिल्यामुळे खासदार नवणीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राणा दाम्पत्यांना सशर्त जामीन मिळाला होता. त्यात माध्यमांशी न बोलण्याची अट होती. परंतु नवनीत राणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राणा दाम्पत्यांनी माध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर सरकारी वकिलांनी सोमवारी त्यांचा जामीन रद्द करण्याचा अर्ज न्यायालयात दिला. या अर्जानंतर राणा दाम्पत्यांना कोर्टाने नोटीस पाठवली असून त्याचे उत्तर 18 मे पर्यंत मागवले आहे.
सरकारी वकील प्रदीप घरत काय म्हणाले?
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याप्रकरणावर सांगितले की, न्यायालयाने जामीन देताना राणा दाम्पत्यांना शर्थ घातली होतली. संबंधीत गुन्ह्या संदर्भात राणांनी माध्यमांसोबत काहीही बोलु नये. या अटीचा त्यांनी भंग केला आहे. न्यायालयाने म्हटलं होतं की, माध्यमांशी संवाद साधल्यास त्यांना दिलेला जामीन हा रद्द करावा लागेल असं न्यायालयाने सांगितलं होतं असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे. तसंच प्रदीप घरत उद्या न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे.
काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा
दरम्यान, लीलावती रुग्णालयातून बाहेर आल्यावर नवणीत राणांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलतांना राणा म्हणाल्या की, "प्रभू श्रीरामाचं नाव घेणं, हनुमंताचं नाव घेणं चूक असेल, तर 14 दिवस काय? मी 14 वर्ष शिक्षा भोगण्यास तयार आहे. तुम्ही माझ्यावर दबाव टाकू शकत नाही. महाविकास आघाडीत सत्तेचा गैरवापर करत आहे. त्यांची तक्रार मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे करणार आहे. तसेच, संजय राऊतांचीही तक्रार करणार आहे." राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांनी थेट आव्हान दिलंय. महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढेल. तसेच आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.