bhonga vs Hanuman Chalisa : राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ ट्विट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातल्या विविध ठिकाणी मनसैनिकांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. अनेक ठिकाणी सकाळच्या अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यात आली होती. आज सकाळी राज्यातल्या विविध भागांमध्ये पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड केली आहे. त्यानंतर मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक नवा व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे हे मशिदींवरील भोंग्यांबाबात ठाम भूमिका घेताना दिसत आहेत.
या व्हिडिओत बाळासाहेब ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय?
ज्या दिवशी या महाराष्ट्रात माझं सरकार येईल त्यावेळी रस्त्यावरील नमाज बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की, जो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल तर त्याने येऊन आम्हाला सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. लाऊडस्पीकर मशिदीवरचे खाली येतील, बंद.
मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांच्यावर सातत्याने आगपाखड सुरु आहे. राज ठाकरे हे समाजात जातीय तेढ निर्माण करत आहेत. महाराष्ट्राला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी टीका केली जात आहे. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही राज ठाकरे हे तरुण मनसैनिकांना मशिदींसमोर स्पीकर्स लावायला सांगून स्वत: फिरायला जातील. त्यानंतर पोलीस या तरुणांना अटक करतील. या तरुण कार्यकर्त्यांचा रेकॉर्ड खराब होईल, अशी टीका पेडणेकर यांनी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा हा व्हिडिओ ट्विट केला असावा का, याची चर्चा सुरु आहे. आता या व्हिडिओवर शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल.