अखेर तारीख ठरली! लवकरच धावणार अहमदनगर ते आष्टी रेल्वे
बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या आशा पल्लवित करणारा मुहूर्त अखेर ठरला आहे. अहमदनगर (Ahmednagar) ते आष्टी दरम्यान येत्या 7 मे रोजी रेल्वे सुरू होणार असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जाहीर केलं आहे. मुंबई (Mumbai) येथे आयोजित भायखळा रेल्वे स्थानकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील आष्टी पर्यंतचं काम पूर्ण झालं असून आष्टी सोलापूरवाडी आणि नारायणडोह हे तीन स्टेशन पूर्ण झाले आहेत. गेल्या महिन्यात या ट्रॅकवर रेल्वेच्या (Indian Railway) सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण तपासणी करण्यात आली आहे.
अहमदनगर ते आष्टी या ट्रॅकवर 120 प्रती तास वेगाने रेल्वे धावली, त्यामुळे या ट्रॅकवरील रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या रेल्वेचं उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे आणि नगरचे खासदार डॉ सुजय विखे यांच्यासह रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान अहमदनगर- आष्टी रेल्वे सुरु होणार असल्याने आष्टी तालुक्यातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचणार असून प्रत्यक्षात रेल्वे सुरु होण्याचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.