'योगी कोण आणि भोगी कोण?' राऊतांचा राज ठाकरेंना सवाल
"उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यात आलेलं आहे. अशाच प्रकारचं पालन महाराष्ट्रातही करावं, अशीच सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्र सरकार नेहमीच न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतं, त्यामुळे हा भोंग्यांचा विषय आहे, तो राजकीय वातावरण तापण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही भोंगेबाजी. आता योगी कोण? भोगी कोण? आणि हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला यावर पीएचडी करायची असेल, तर ती त्यांनी करायला हवी. फार इंटरेस्टिंग विषय आहे हा.", असा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Raj Thackeray Praised Yogi Adityanath) यांचं कौतुक केलं. त्यानंतर संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज राज ठाकरेंना टोला लगावला आहे. भोंग्यांचा विषय राजकीयदृष्ट्या तापविण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण देशाचे असतात. ज्या राज्यात विरोधी पक्षाचे सरकार आहे त्या राज्यांबाबत पंतप्रधानांनी अधिक संवेदनशील राहणे गरजेचे आहे. पण, पंतप्रधान तसं करत नाहीत. बिगरभाजपशासित राज्यांना सावत्र वागणूक दिली जाते, असे आरोप संजय राऊतांनी केले आहे.
तसेच त्यांनी मोहन भागवतांनी धर्म आणि हिंसेबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही धर्म हिंसेचा मार्ग अवलंबत असेल तर तो धर्म अधोगतीला जातो, या मोहन भागवतांच्या वक्तव्याचं स्वागत व्हायला पाहिजे. याचं आपल्याच देशात मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे, असंही राऊत म्हणाले.