"गुजरात, उत्तर प्रदेशात भोंगे कमी झाले का? याची राज ठाकरेंनी चौकशी करावी"
सातारा प्रतिनिधी | प्रशांत जगताप : लोक राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ओळखून आहेत. गुजरात आणि उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) येथील मशिदीवरील भोंगे कमी झालेत का? असा सवाल आज राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्षाची परिसंवाद यात्रा साताऱ्यात आली असून याची सुरुवात वाई तालुक्यातुन झाली आहे. यावेळी जयंत पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या भोंगा विरुद्ध हनुमान चालिसा या राजकारणावर भाष्य केलं.
राज्यात सध्या राष्ट्रवादीची परिसंवाद यात्रा सुरु असून, पक्ष संघटनेशी संवाद हा या परिसंवाद यात्रेचा उद्देश असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी भोंगे कुठे लावा, कुणाच्या मशिदीसमोर लावा हे सुरु आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील मशिदीवरील भोंगे कमी झाले आहेत का? याची चौकशी करण्याचा सल्ला राज ठाकरे यांना सल्लाही जयंत पाटलांनी दिला आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीत राज ठाकरे यांचा मुद्दा महाविकास आघाडीला डिस्टर्ब करू शकणार नाही. लोक राज ठाकरे यांना ओळखून असल्याचा टोला मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.