सातारा शहरासह परिसरात रात्रीपासून कोसळधारा सुरू; कोयना धरणात 100.70 टीएमसी पाणीसाठा
प्रशांत जगताप, सातारा
सातारा शहर आणि परिसरात रात्रीभर पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसापासून सातारा जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार उडाला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले तर शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. पाली येथील शेतकऱ्यांनी तारळी नदीमध्ये आलं धुण्यासाठी आणले होते ते देखील वाहून गेलंय. नदी,नाले,ओढ्याना पूर आल्याने अनेक नागरिकांची गैरसोयी झाली आहे. राज्यात आगामी 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सातारा जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आलाय.
कोयना धरणात 100.70 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण अंतर्गत विभागात सुरू असलेल्या पावसामुळे आणि धरणातील संपुष्टात आलेली पाणी साठवून क्षमता लक्षात घेता कोयना धरण पायथा वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीज निर्मिती करून प्रति सेकंद 1050 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.