गुलाम नबी आझादांच्या निवृत्तीनंतर राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदाची धुरा ‘यांच्या’कडे….
लोकशाही न्यूज नेटवर्क
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ येत्या तीन दिवसांत पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदही रिक्त होत आहे. काँग्रेसने आता या पदासाठी नव्या नेत्याची निवड केली असून तसा प्रस्तावही राज्यसभा अध्यक्षांकडे दिला आहे.
गुलाम नबी आझाद यांचा 15 फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनिमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या कामाचे आणि देशसेवेचे कौतुक केले. आता काँग्रेसने ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड केली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना तशी शिफारस केली आहे. त्यामुळे खर्गे यांच्या निवडीची फक्त औपचारिकता राहिली आहे.
काँग्रेसचे कर्नाटकमधील नेते अलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांना राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाते. खर्गे यांनी यापूर्वी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी याआधी काँग्रेसचे गटनेते म्हणून सभागृहात काम पाहिले आहे. संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरह त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले होते.