कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री; बसवराज बोम्मई यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. भाजपच्या दिल्लीतील नेतेमंडळींकडून कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर दबाव असल्याच्या अनेक चर्चा या काळात रंगल्या. पण, येडियुरप्पांनी सोमवारी आपल्यावर कोणताही दबाव नसून स्वेच्छेने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर बसवराज बोम्मई यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
आज ११ वाजता बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्यांना शपथ दिली. माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा शपथविधी दरम्यान उपस्थित होते. या बरोबरच भाजपचे इतर अनेक बडे केंद्रीय व राज्य ज्येष्ठ नेतेही या कार्यक्रमात उपस्थित होते. बोम्मई कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री असणार आहेत.